रक्षाबंधन म्हणजे बहीण भावातील प्रेम साजरा करण्याचा दिवस. हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधन साजरी केली जाते. म्हणूनच याला ‘राखीपौर्णिमा’ असं देखील म्हटलं जातं. या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि भावाच्या हातावर राखी बांधते. रक्षाबंधन म्हणजे रक्षा करण्याचं वचन. बहिणीने बांधलेल्या या धाग्याचा आदर ठेऊन भाऊ बहिणीला आयुष्यभर सुखी ठेवण्याचं आणि तिचं रक्षण करण्याचं वचन देतो. राखीपौर्णिमा ही भारतातातील जवळपास सगळ्याच भागात साजरी केली जाते. या सणाला प्रांतानुसार वेगवेगळी नाव देखील आहेत. राखीपोर्णीमेला भारतातील इतर भागात काय नाव आहेत आणि हा सण तिथे कसा साजरा केला जातो , ते जाणून घेऊयात.
नारळी पौर्णिमा
महाराष्ट्र, गुजरात, गोवा , कर्नाटक या भारताच्या पश्चिमकडे असलेल्या राज्यांमध्ये रक्षाबंधनासोबतच नारळीपौर्णिमा देखील साजरी केली जाते. ज्या लोकांचा उदरनिर्वाह हा समुद्र आणि त्यातून मिळणाऱ्या गोष्टींवर अवलंबून आहे, अशा लोकांकडून समुद्राला नारळ अर्पण करून नारळीपौर्णिमा साजरी केली जाते. मुख्यतः मच्छिमार आणि कोळी लोकांमध्ये या सणाला मोठं महत्व आहे.
अवनी अवित्तम
राखीपोर्णीमा ही केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि ओरिसा या दक्षिण भारतातील राज्यांमध्ये अवनी अवित्तम म्हणून साजरी केली जाते. या दिवसाला उपकर्मम असं देखील म्हटलं जातं. हातातला पवित्र धागा ब्राह्मण या दिवशी बदलतात , म्हणून ब्राह्मणांसाठी या दिवसाचं विशेष महत्व आहे.
कजरी पौर्णिमा
रक्षाबंधन हा सण मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगढ आणि बिहार या राज्यांमध्ये श्रावणी किंवा कजरी पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. शेतकरी आणि मुलगा असलेल्या मातांसाठी या सणाला विशेष महत्व आहे.
पवित्रपौर्णिमा
गुजरातमध्ये रक्षाबंधन या सणाला पवित्रपौर्णिमा असं म्हणतात. या दिवशी गुजरातमध्ये भगवान शंकराची पूजा केली जाते. भारताच्या विविध भागांमध्ये राखीपौर्णिमेला प्रांतानुसार अनेक नावं आहेत. रक्षाबंधन वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जात असला तरी हा सण साजरा करण्यामागे रक्षा करणे हा एकच उद्देश आहे.