How To Apply Aloe Vera Gel On Face In Summer : उन्हाळ्यात सूर्यप्रकाश, उष्णता, धूळ आणि घाम यांमुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात. लोकांना मुरुमे, सनबर्न, रॅशेस आणि टॅनिंग यांसारख्या त्वचेच्या समस्यांचा त्रास होतो, त्यामुळे या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी लोक विविध प्रकारचे स्किन केअर आणि ब्युटी प्रोडक्ट्स, तर अनेक घरगुती उपायसुद्धा करून पाहतात. पण, त्यात हानिकारक रसायने असतात, जी त्वचेला नुकसान पोहोचवू शकतात.

म्हणून उन्हाळ्यात त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी तुम्ही काही नैसर्गिक गोष्टी वापरू शकता. यामध्ये कोरफडीचादेखील समावेश आहे. हो, तुम्ही बरोबर वाचलेत… कोरफड त्वचेला थंडावा आणि ओलावा प्रदान करते. तसेच ते त्वचेची जळजळ आणि सनबर्नपासून मुक्त होण्यास मदत करते. त्यात अँटी-बॅक्टेरियल, अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत, जे मुरुमे, डाग, पिग्मेंटेशन आणि टॅनिंगपासून मुक्त होण्यास मदत करू शकतात. नियमितपणे चेहऱ्यावर कोरफड लावल्याने त्वचा मऊ, चमकदार होते. पण, तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोरफड चेहऱ्यावर नेमकी कशी लावायची? तर याचबद्दल आपण बातमीतून जाणून घेऊ…

उन्हाळ्यात चेहऱ्यावर कोरफड कशाप्रकारे लावायची?

१. मुलतानी माती आणि अ‍ॅलोवेरा जेल (Aloe vera and multani mitti)

उन्हाळ्यात तुम्ही अ‍ॅलोवेरा जेल मुलतानी मातीमध्ये मिसळून तुमच्या चेहऱ्यावर लावू शकता. यासाठी एका भांड्यात दोन चमचे मुलतानी माती घ्या. त्यात दोन चमचे ताजे कोरफड जेल घाला आणि ते चांगले मिसळा. आता ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा धुवा, यामुळे तुम्हाला मुरुमे, डाग, सुरकुत्या, सनबर्न आणि टॅनिंगच्या समस्येपासून मुक्तता मिळू शकते.

२. अ‍ॅलोवेरा जेल आणि गुलाब पाणी (Aloe Vera And Rose Water)

उन्हाळ्यात तुम्ही गुलाब पाण्यात अ‍ॅलोवेरा जेल मिसळून तुमच्या चेहऱ्यावर लावू शकता. यासाठी एका भांड्यात एक चमचा अ‍ॅलोवेरा जेल घ्या, त्यात गुलाब पाण्याचे काही थेंब घाला आणि मिक्स करून घ्या. आता मिश्रण तुमच्या चेहऱ्याला लावा आणि काही वेळ तसेच राहू द्या. सुमारे १५ मिनिटांनी पाण्याने चेहरा धुवा, यामुळे तुमची त्वचा मऊ, चमकदार दिसेल. तसेच त्वचेची जळजळ आणि लालसरपणा कमी होईल.

३. अ‍ॅलोवेरा आणि लिंबू (Aloe vera and lemon)

उन्हाळ्यात फ्रेश आणि चमकदार त्वचा मिळविण्यासाठी तुम्ही कोरफड आणि लिंबू मिसळून चेहऱ्यावर लावू शकता. लिंबामध्ये सायट्रिक ॲसिड असते, जे त्वचेवरील डाग दूर करण्यास मदत करते. तसेच यामुळे त्वचेचा रंग सुधारण्यास मदत होते. यासाठी एका भांड्यात दोन चमचे ताजे कोरफड जेल घ्या. त्यात एक चमचा लिंबाचा रस घाला आणि मिक्स करून घ्या. आता हे मिश्रण तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि सुमारे १० मिनिटांनी पाण्याने चेहरा धुवा, यामुळे तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येईल.

४. अ‍ॅलोवेरा आणि काकडी (Aloe vera and cucumber)

उन्हाळ्यात तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर कोरफड आणि काकडी मिसळून लावू शकता. काकडी त्वचेला थंडावा आणि ताजेपणा देते. तसेच ते टॅनिंग आणि डाग कमी करण्यास मदत करते. यासाठी एका भांड्यात एक चमचा कोरफड जेल घ्या. त्यात एक चमचा काकडीचा रस घाला आणि ते चांगले मिक्स करून घ्या. आता ते तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि काही वेळ तसेच राहू द्या. १५ मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा, यामुळे तुमची त्वचा मऊ आणि चमकदार होईल.

५. अ‍ॅलोवेरा आणि मध (Aloe vera and honey)

उन्हाळ्यात तुम्ही मधात अ‍ॅलोवेरा मिसळून तुमच्या चेहऱ्यावर लावू शकता. यासाठी एका भांड्यात एक चमचा अ‍ॅलोवेरा घ्या. त्यात एक चमचा मध, चिमूटभर हळद घाला आणि चांगले मिसळा. आता हे मिश्रण तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हातांनी गोलाकार फिरवून मालिश करा. सुमारे २० मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा. यामुळे त्वचेवरील डाग, मुरुमे आणि टॅनिंगच्या समस्या दूर होऊ शकतात. तसेच, त्वचा मऊ आणि चमकदार होईल.