How to be a good daughter in law : लग्न या पवित्र बंधनात अडकल्यानंतर दोन व्यक्ती नव्या आयुष्याची सुरुवात करतात. या नव्या प्रवासात नवे कुटुंब लाभते. विशेषत: मुलींसाठी लग्न हे खूप मोठे आव्हान असते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय विवाह व्यवस्थेनुसार मुलींना लग्नानंतर आई-वडिलांचे घर सोडून सासरी नव्या घरी यावे लागते आणि येथूनच तिची खरी परीक्षा सुरू होते. वैयक्तिक गोष्टींसह नव्या कुटुंबाची जबाबदारी असते. सून म्हणून वावरताना घरातील सर्व लोकांची काळजी घ्यावी लागते.

आज आपण एक चांगली सून बनण्यासाठी काय करावे, हे जाणून घेणार आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही सासरच्या लोकांची प्रिय व्यक्ती बनू शकता.

नेहमी सकारात्मक राहा

नव्या आयुष्याची सुरुवात करताना नेहमी सकारात्मक राहणे गरजेचे आहे. लग्नानंतर मुलींनी सकारात्मक दृष्टिकोनातून सर्व समस्यांचा सामना केला पाहिजे. सासरी जाण्यापूर्वी सासरच्या लोकांविषयी नकारात्मक विचार मनात आणू नये. स्वत:वर नेहमी विश्वास ठेवावा.

हेही वाचा : केळी फ्रिजमध्ये ठेवण्याची चूक तुम्हीही करता? जाणून घ्या दुष्परिणाम

आदर करा

लग्नानंतर नवीन कुटुंबात वावरताना सुनेने नेहमी सासरच्या माणसांचा आदर करायला पाहिजे. एक चांगली सून होण्यासाठी हा एक चांगला गुण आहे. सुनेने नेहमी सासू-सासऱ्यांना आई-वडिलांप्रमाणे वागवावे. त्यावरून मुलीचे संस्कार दिसून येतात. सासरच्या लोकांचा आदर करणे हे एका सुनेचे सर्वांत मोठे कर्तव्य आहे.

सासरच्या रूढी-परंपरा स्वीकारा

अनेकदा माहेरच्या आणि सासरच्या रूढी-परंपरा वेगवेगळ्या असतात. अशात नव्या सुनेने सासरच्या रूढी-परंपरा स्वीकारल्या पाहिजेत. एक आदर्श सून बनण्यासाठी नव्या घरातील नव्या गोष्टी स्वीकारणे तितकेच गरजेचे आहे. जर तुम्हाला नव्या गोष्टी आत्मसात करायला अडचणी येत असतील, तर सासूशी प्रेमाने संवाद साधा आणि त्यांना तुमची समस्या सांगा.

सासरच्या लोकांची काळजी घ्या

लग्नानंतर फक्त दोन व्यक्तींचेच नवे आयुष्य सुरू होत नाही, तर त्यामध्ये कुटुंबाचाही तितकाच सहभाग असतो. लग्नानंतर मुलीची जबाबदारी फक्त नवऱ्यापुरतीच मर्यादित राहत नाही; तर तिला कुटुंबाची जबाबदारीही स्वीकारावी लागते. सासरच्या लोकांची काळजी घेणे हा एका चांगल्या सुनेचा गुण आहे. सासरच्या सुख-दु:खात सहभागी होणेही तितकेच गरजेचे आहे.

हेही वाचा : मुलींनो, लग्नाला होकार देण्याआधी जोडीदाराबरोबर ‘या’ गोष्टींवर एकदा चर्चा करा, नाहीतर वैवाहिक जीवनात येऊ शकतात अडचणी

संवाद साधा

प्रत्येक वेळी सर्व गोष्टी मनाप्रमाणे होत नाहीत. अशा वेळी सुनेने सासरच्या लोकांबरोबर मनमोकळेपणाने संवाद साधला पाहिजे. एखादी गोष्ट आवडली नाही, तर त्याविषयी कोणाच्याही भावना न दुखवता सासरच्या लोकांबरोबर बोलायला हवे. जर तुमच्या हातून एखादी चूक झाली असेल, तर त्वरित माफी मागा. त्यामुळे गैरसमज निर्माण होत नाहीत आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहते.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to be a good daughter in law these are qualities for impressing mother in law ndj