बहिणीच्या लग्नावेळी घागरा घालायचा आहे. पण त्यासाठी पोट कमी व्हायला हवे. २० दिवसांत पोट बारीक करण्याचा मंत्र शोधता आहात? वजन कमी करण्यासाठी वर्षभराचे पथ्य पाळण्याऐवजी काही महिन्यांच्या आहार नियंत्रणातून बारीक होण्याकडे अनेकांचा कल असतो. एखादा लग्न समारंभ, वाढदिवस, कार्यालयातील कार्यक्रमासाठी महिना तर कधी आठवडय़ापूर्वी कडक पथ्य पाळून बारीक होणे अधिक सोपे वाटत असले तरी सातत्याने शरीराला आवश्यक पोषणमूल्यांचा अभाव जाणवतो आणि यातून अशक्तपणा, भोवळ येणे यांसारख्या समस्या उद्भवतात.
समाजमाध्यमांवर वजन कमी करण्याचा मार्ग दाखवणाऱ्या अनेक चित्रफिती फिरत असतात. अनेकदा आहारबंदी करा किंवा आठवडाभर केवळ फलाहार करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र प्रत्येक व्यक्तींवर या पद्धतींचा सकारात्मक परिणाम होईल याची शाश्वती नसते. त्यामुळे अशा पद्धतींचा अवलंब करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेतला तर उपयुक्त ठरते. महिनाभरावर असलेल्या कार्यक्रमासाठी एखादा अवयव (हाताचे दंड, मांडय़ा, पोट) कमी करणे आव्हानात्मक असते. मात्र आहाराचे तंत्र न बिघडवताही बारीक होणे शक्य असते. आहारातील पाण्याच्या प्रमाणात वाढ करावी आणि बाहेरील अन्नपदार्थ किंवा फास्ट फूड खाणे पूर्णत: बंद करावे, असे आहारतज्ज्ञ डॉ. अस्मिता सावे यांनी सांगितले. शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी बाहेरील उष्मांक घेणे बंद करावे. आहारात चरबी किंवा मेदयुक्त पदार्थ खाऊ नयेत. प्रथिनयुक्त आहार घेताना मांसाहार करू नये. अंडे खायचे असल्यास केवळ पांढरा भाग खाणे उपयुक्त. महिनाभर तेलकट, मैदायुक्त, साखर खाऊ नये. आहार कमी करण्याबरोबरच व्यायामाची जोड द्यावी. दिवसभरात किमान दोन तास व्यायाम करा. एकाच वेळी दोन तास व्यायाम करणे शक्य होत नसेल तर सकाळी-सायंकाळी व्यायामाच्या वेळा वाटून घ्याव्यात. व्यायामाचा संपूर्ण शरीरावर परिणाम होत असतो.
मात्र एखादा अवयव कमी करावयाचा असल्यास त्या भागाचा जास्त व्यायाम करावा. अनेकदा शरीराच्या अवयवांच्या तुलनेत पोट वाढण्याची समस्या अनेकांना भेडसावते. यासाठी ‘क्रन्चेस’ हा प्रकार फायद्याचा ठरतो. व्यायाम सुरू करण्यापूर्वी वॉर्मअप महत्त्वाचा. त्यानंतर क्रन्चेसला सुरुवात करावी. साइड क्रन्चेसमुळे पोटाचा घेर कमी होण्यास मदत होते. पोट कमी करण्यासाठी हा प्रकार अतिशय फायद्याचा आहे, असे व्यायाम प्रशिक्षक राहुल चौधरी यांनी सांगितले. मुळातच आहारावर नियंत्रण आणल्यामुळे शरीरात उष्मांक जमा होत नाही. त्यामुळे शरीरातील अतिरिक्त उष्मांक व्यायामाच्या जोडीने कमी करणे शक्य असते, असेही त्यांनी नमूद केले, तर फिटनेसतज्ज्ञ बिपीन साळवी पोट कमी करण्यासाठी रशियन ट्वीस्ट हा व्यायाम करण्याचा सल्ला देतात. हा व्यायाम प्रकार कंबर कमी करण्यास उपयुक्त ठरतो. प्रथम दोन्ही पायांमध्ये थोडे अंतर ठेवून उभे राहावे. उजवा हात उजव्या दिशेला वरच्या बाजूला ताठ करावा. हाताच्या तळहातावर ताट किंवा पाण्याने भरलेली बाटली ठेवून हात हळूहळू डाव्या दिशेने न्यावा. या वेळी पाठीचा कणा ताठ ठेवा पोक काढू नका. कंबरेत जेवढे वाकणे शक्य असेल तेवढे वाकून हा व्यायाम प्रकार करावा. या प्रकारात कंबरेवरील स्नायू ताणले जातात. पहिल्यांदा हा व्यायाम करीत असल्यास कमी वेळ करावा आणि हळूहळू वाढवावा. त्यामुळे कंबरेची चरबी कमी होते, असे साळवे यांनी सांगितले.
समाजमाध्यमांवर अतिशय घातक पद्धतीने वजन कमी करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र यातून शरीराला आवश्यक पोषकमूल्ये मिळत नाहीत. यातून त्वचा कोरडी होणे, चेहऱ्यावर सुरकुत्या येणे असे प्रकारही घडतात. मात्र महिनाभरानंतर नियमित दिनचर्या सुरू झाल्यानंतर वजन वाढण्याची शक्यता असते. महिनाभर आहारावर नियंत्रण ठेवल्यानंतर वजन कमी होत असले तरी पुन्हा आहारात वाढ झाल्यानंतर वजन जास्त वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे वजन कमी झाल्यानंतरही व्यायाम सुरू ठेवावा. दोन तास व्यायाम करणे शक्य नसेल तर किमान ४० मिनिटे व्यायाम करावा.