सणासुदीला किंवा लग्नसमारंभात आपण खुलून दिसावे असे प्रत्येक महिलेला वाटते. मग यासाठी मुलींपासून ते वयस्कर महिलांपर्यंत सगळ्याच जणी कपडे, दागिने, पादत्राणे यांची खरेदी करण्यासाठी बरेच पैसे आणि वेळ खर्च करतात. पण आपण खर्च करत असलेल्या वेळेचा आणि पैशांचा योग्य पद्धतीने उपयोग व्हावा यासाठी आपल्याला किमान फॅशन सेन्स असणे गरजेचे असते. आपल्याला काय चांगले दिसू शकते, कोणत्या कपड्यांवर कशा पद्धतीचे दागिने चांगले दिसतील या गोष्टींची माहिती असणे आवश्यक असते. पारंपरिक दागिन्यांची वेगळी ओळख असली तरीही फॅशनच्या जगतात आधुनिक दागिन्यांचेही एक वेगळे स्थान आहे. याच आधुनिक दागिन्यांविषयी फॅशन डिझायनर प्रज्ञा म्हस्के यांनी दिलेल्या फॅशनच्या काही खास टीप्स…
झुमके : इंडो-वेस्टर्न स्कर्ट किंवा पारंपरिक पोशाखांवर झुमके हा अतिशय उत्तम पर्याय आहे. ऑफिस पार्टी किंवा एखाद्या अनौपचारिक कार्यक्रमासाठी देखील आपण झुमके वापरू शकतो. या झुमक्यांमध्ये सध्या अगदी कमी किमतीपासून सोन्यापर्यंतचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. थोडे मोठे झुमके घातल्यावर गळ्यात काहीच नाही घातले तरीही चालते. साडी, ड्रेस आणि इतर कोणत्याही पॅटर्नवर झुमके खुलून दिसतात.
चांदबाली : तुम्हाला स्वतःची छाप पडायची असेल तर कानात चांदबाली हाही एक उत्तम पर्याय आहे. तुमचा लूक खुलवण्याबरोबरच पार्टीमध्ये खुलून दिसण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. नव्याने आलेला हा कानातल्यांचा प्रकार कोणत्याही प्रकारच्या कपड्यांवर शोभून दिसतील.
बांगड्या: बांगड्या नेहमीच भारतीय उत्सव आणि संस्कृतीला समानार्थी आहेत. आता, पारंपारिक कडे, हीरेजडित बांगड्या किंवा रंगीबेरंगी रत्नजडित बांगड्या असे अनेक पर्याय बांगड्या निवडण्यासाठी आहेत. आपण पूजेसाठी कडे किंवा हिरव्या बांगड्यांसह आणखीही वेगळी स्टाईल करु शकता. त्यासाठी बाजारात अनेक पर्याय उपलब्ध असतात. हे नवनवीन प्रकार ट्राय करायला हवेत.