व्यायाम, योग आणि विविध मैदानी खेळ खेळण्यासाठी हल्ली मुली स्पोर्ट्स ब्रा वापरणे पसंत करतात. कारण- स्पोर्ट्स ब्रामुळे कोणतेही वर्कआऊट किंवा योगा प्रकार करताना नीट लक्ष केंद्रित करता येते. पण, यावेळी जर चुकीच्या साईजची किंवा प्रकारची ब्रा वापरली, तर त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतोच. त्याशिवाय स्तनाचा आकार बदलतो आणि व्यायाम करताना अवघडल्यासारखे वाटते. त्यामुळे चांगल्या आणि योग्य प्रकारची स्पोर्ट्स ब्रा खरेदी करणे फार आवश्यक आहे. परंतु, ती खरेदी करण्याआधी काही गोष्टींची विशेष काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे.
स्पोर्ट्स ब्रा नेमकी कशासाठी वापरतात?
फिट राहण्यासाठी तुम्ही बऱ्याचदा जिम, योगा क्लासेस किंवा मॉर्निंग वॉकला जाता. त्यावेळी कोणत्याही शारीरिक हालचाली करताना शरीर रिलॅक्स असणे फार गरजेचे असते. अशा वेळी स्पोर्ट्स ब्रामुळे तुम्हाला रिलॅक्स राहण्यास मदत होते. शारीरिक हालचाली करताना अवघडल्यासारखे वाटत नाही. त्यामुळे स्तनांचा आकार फिट राहतो.
योग्य स्पोर्ट्स ब्रा कशी खरेदी करायची?
१) स्पोर्ट्स ब्रा ही सामान्य ब्रापेक्षा थोडी घट्ट असते. पण, ती इतकीही घट्ट नसावी की श्वास घेणेही कठीण होईल.
२) स्पोर्ट्स ब्रा फिटिंग चेक करण्यासाठी हातांच्या बोटांचा वापर करा. हाताची दोन बोटे खांदा आणि ब्राच्या स्ट्रिपमध्ये राहिली, तर ती ब्रा योग्य फिटिंगची आहे, असे समजा. त्याशिवाय ब्राच्या स्ट्रिपने अंडरआर्म्स आणि शोल्डर स्ट्रॅपची त्वचा आवळली जाणार नाही याचीही काळजी घ्या. तसेच ती घातल्यानंतर स्तनांना योग्य आधार मिळतोय की नाही हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
३) ब्रा घातल्यानंतर बॉडी पोश्चर नीट आहे की नाही ते तपासून बघा. कारण- स्पोर्ट्स ब्रा घातल्यानंतर बॉडी पोश्चर नीट नसेल, तर अनेक समस्या भेडसावू शकतात. त्यात व्यायाम करताना योग्य साईजचीच ब्रा घालणे फार गरजेचे असचे; अन्यथा हेवी वर्कआउटमुळे स्तनांचा आकार खराब होऊ शकतो. स्तनांना योग्य आधार मिळत असेल, तर पाठीचा कणासुद्धा ताठ राहण्यास मदत होईल.
४) सध्या अनेक प्रकारच्या ब्रा बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे जिमसाठी नक्की कोणती ब्रा खरेदी करावी ते लक्षात येत नाही. त्यात हेवी वर्कआऊट करणार असाल, तर मोठ्या स्ट्रिप्स आणि पॅडेड ब्रा खरेदी करा. त्यामुळे स्तनांना चांगला आधार मिळेल.
५) जर स्पोर्ट्स ब्राची स्ट्रिप खूप पातळ आणि ब्रा घट्ट असेल, तर व्यायाम करताना खांद्यावरील त्वचेला इजा होऊ शकते. खांद्यावरील त्वचेवर निशाणी तयार होत, त्वचा लाल होऊ शकते.
६) जर स्पोर्ट्स ब्राच्या मागचा पट्टा खूप जास्त फिट असेल, तर वर्कआउट करताना घामामुळे अंगावर पुरळ, खाज येणे अशा त्वचा आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात. अशा वेळी जास्त फिट पट्टा असलेली ब्रा निवडू नका.