घराची स्वच्छता करताना अनेकदा खिडक्यांच्या काचा, खासकरून डास किंवा कबुतरे घरात येऊ नयेत यासाठी बसवलेली जाळी कशी स्वच्छ करायची, असा प्रश्न अनेकांसमोर असतो. अनेकदा या जाळीच्या स्वच्छतेकडे दुर्लक्षदेखील केले जाते. मात्र, असे केल्याने या खिडकीवर किंवा जाळीवर अधिक धूळ साचल्यावर ती साफ करणे अधिक त्रासदायक होते.
असे होऊ नये, तसेच घरासह घराच्या खिडक्या व जाळ्या साफ आणि नीटनेटक्या ठेवण्यासाठी यूट्युबवरील @ZatpatMarathiTips नावाच्या चॅनेलने काय करावे याबद्दल टिप्स दिल्या आहेत. अतिशय साधी आणि सोपी पद्धत वापरून घराच्या खिडक्या आणि जाळ्या कशा स्वच्छ करायच्या ते पाहा.
घरातील खिडक्यांच्या काचा आणि जाळ्या साफ करायची ट्रिक
हेही वाचा : Home gardening : घरच्या कुंडीत ‘कोथिंबीर’ लावताना काय करावे, काय नको? पाहा या टिप्स
१. जाळीच्या खिडक्यांची स्वच्छता :
साहित्य
भांडी घासायचा लिक्विड डिश वॉश / साबण
पाणी
दात घासायचा ब्रश
मोठ्या आकाराचा ब्रश
स्प्रे बाटली
कृती
सर्वप्रथम तुमच्या आवश्यकतेनुसार एका स्प्रे बाटलीमध्ये भांडी घासायचा लिक्विड साबण आणि पाणी मिसळून एक मिश्रण बनवून घ्या.
हे मिश्रण जाळीच्या खिडक्या किंवा जाळीवर स्प्रे बाटलीच्या मदतीने स्प्रे करावे. ही क्रिया खिडकीवर खालपासून ते वरपर्यंत करावी.
आता एका बाऊमध्ये लिक्विड साबण घेऊन, त्यामध्ये दात घासायचा ब्रश बुडवून घ्या. या ब्रशच्या मदतीने संपूर्ण जाळीची चौकट, कोपरे घासून घ्यावेत.
त्यानंतर मोठ्या आकाराच्या ब्रशने संपूर्ण खिडकीची जाळी घासून घ्यावी. ही क्रिया जाळीच्या दोन्ही बाजूंनी करावी.
आता पाण्याचा मग / तांब्या घेऊन हळूहळू जाळीवर पाणी घाला आणि हातांच्या मदतीने जाळी धुऊन घ्या.
खिडकीवर ओतलेले पाणी घरात पसरू नये यासाठी खिडकीच्या कट्ट्यावर एखादा जाडसर टॉवेल ठेवावा. असा टॉवेल ठेवल्याने खिडकीवरून ओघळलेले पाणी टॉवेलमध्ये शोषून घेतले जाईल.
अशा पद्धतीने तुम्हाला जाळी असलेली कोणतीही खिडकी अगदी सहज आणि झटपट स्वच्छ करता येऊ शकते.
२. खिडकीच्या काचा कशा स्वच्छ करायच्या पाहा :
भांडी घासायचा लिक्विड डिश वॉश / साबण
पाणी
मोठ्या आकाराचा ब्रश
काचा स्वच्छ करायचा वायपर
कृती
प्रथम एका स्प्रे बाटलीमध्ये थोडा भांडी घासायचा लिक्विड साबण आणि पाणी मिसळून एक मिश्रण बनवून घ्या.
हे मिश्रण स्प्रे बाटलीमध्ये भरून घ्या आणि खिडकीच्या काचेवर स्प्रे करा.
मोठ्या आकाराचा ब्रश घेऊन संपूर्ण खिडकी स्वच्छ घासून घ्यावी. ही कृती काचेच्या दोन्ही बाजूंनी करावी.
आता खिडकी घासून झाल्यावर, काचा स्वच्छ करणाऱ्या वायपरच्या मदतीने काचांवरील साबण साफ करावा.
साबण साफ करून झाल्यावर, खिडकीच्या काचेवर साधे पाणी घालून घ्या. तेदेखील वायपरच्या मदतीने स्वच्छ करून घ्या.
शेवटी तुम्हाला हवे असल्यास एखाद्या स्पंजच्या मदतीने खिडकीची संपूर्ण काच पुसून घ्यावी.
अशा पद्धतीने तुम्हाला कोणतीही काच अगदी सहज आणि झटपट स्वच्छ करता येऊ शकते.
घरातील काचेची किंवा जाळीची कोणतीही खिडकी अगदी काही मिनिटांमध्ये स्वच्छ करण्याची ही पद्धत आवडली असल्यास तुम्ही हा प्रयोग तुमच्या घरी करून पाहू शकता.