Switch Board Cleaning Hacks : घराची साफसफाई करताना अनेकदा स्विच बोर्डच्या सफाईकडे दुर्लक्ष होते, त्यामुळे सर्व घरं चकचकीत दिसत असली तर घाण साचल्याने स्विच बोर्ड मात्र काळा, चिकट घाणेरडा दिसतो.

पण, स्विच बोर्ड स्वच्छ करताना विजेच्या धक्क्याच्या भीतीने काही लोक तो साफ करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. यात स्वयंपाकघरातील स्विच बोर्ड तेलकट चिकट हातांनी ऑन-ऑफ केल्याने ते फारच घाण दिसू लागतात. अशावेळी त्यावरील घाण स्वच्छ करणे खूप कठीण होते.

पण, आज आम्ही तुम्हाला अशा तीन सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही काही मिनिटांत स्विच बोर्डवरील चिकट, तेलकट, काळे डाग सहज साफ करू शकता.

स्विच बोर्ड स्वच्छ करण्यासाठी ४ जबरदस्त टिप्स (4 Instant Hacks to Clean Electrical Switch Boards at Home)

१) थिनर / नेल पेंट रिमूव्हर

घरी इलेक्ट्रिकल बोर्डवरील बटणे स्वच्छ करण्यासाठी तुम्ही थिनर किंवा नेल पेंट रिमूव्हरचा वापर करू शकता. या दोन्हीमध्ये असलेले अॅसिड घाण काढून टाकण्यास मदत करते. यासाठी एका छोटा कापडाचा तुकडा नेल पेंट रिमूव्हर किंवा थिनरमध्ये बुडवा. नंतर त्याने स्विच बोर्ड पुसा. सर्व डाग व्यवस्थित पुसून झाल्यानंतर बोर्ड पुन्हा स्वच्छ कोरड्या कापडाने पुसून टाका.

२) बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस

धूळ, घाणीमुळे काळा पडलेला स्विच बोर्ड स्वच्छ करण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा आणि लिंबाचा रसदेखील वापरू शकता. यासाठी एका भांड्यात बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस मिसळून जाडसर पेस्ट तयार करा. ब्रशच्या मदतीने ती पेस्ट बोर्डवर लावा. काही मिनिटं अशीच राहू द्या. त्यानंतर सुती कापडाने बोर्डवरील पेस्ट थोडी घासा. अशाप्रकारे तुम्ही स्विच बोर्ड पुन्हा नव्यासारखा स्वच्छ, चकचकीत करू शकता.

३) व्हिनेगर आणि लिंबाचा रस

काळाकुट्ट झालेला स्विच बोर्ड स्वच्छ करण्यासाठी तुम्ही एक कप पाण्यात दोन चमचे व्हिनेगर आणि एक चमचा लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण जुन्या टूथब्रश किंवा सुती कापडाने स्विच बोर्डवर चांगले घासून घ्या. असे केल्याने स्विच बोर्डवरील सर्व हट्टी डाग निघून जातील आणि तुमचा स्विच बोर्ड अगदी नव्यासारखा चमकेल.

४) बोरॅक्स पावडर आणि लिंबाचा रस

तुम्ही बोरॅक्स पावडरच्या मदतीनेही स्विच बोर्ड स्वच्छ करू शकता. हार्डवेअरच्या दुकानात तुम्हाला ती सहज मिळून जाईल, यासाठी एका भांड्यात तीन चमचे बोरॅक्स पावडर घ्या, त्यात लिंबाचा रस आणि पाणी घालून घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट स्विच बोर्डला लावून १० मिनिटे तशीच ठेवा, नंतर ब्रशच्या मदतीने स्विच बोर्ड स्वच्छ करा, नंतर कापडाने पुसून टाका.

‘ही’ गोष्ट लक्षात ठेवा

काळा झालेला स्विच बोर्ड स्वच्छ करण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे वीजपुरवठा बंद करा, अन्यथा विजेचा धक्का बसू शकतो. तसेच घरातील सदस्यांनाही वीजपुरवठा बंद केल्याबाबत माहिती द्या, जेणेकरून साफसफाई करताना चुकूनही वीज चालू केली जाणार नाही.