Fan Cleaning: उन्हाळा येताच पंखा, कूलर व एसीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यातही घरोघरी कूलर आणि एसीपेक्षा सर्वाधिक वेळ पंख्याचा वापर केला जातो. पंखे सतत चालू असल्यामुळे खूप घाणेरडे व चिकट दिसू लागतात. जर पंखे वेळोवेळी स्वच्छ केले, तर ते नव्यासारखे दिसतात. त्याशिवाय त्यांची हवादेखील जास्त प्रमाणात जाणवते. पण, त्यांना स्वच्छ करण्याचे काम त्रासदायक वाटू शकते. कारण, जेव्हा पंख्याची पाती काळी होतात तेव्हा त्यांना चमकवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. पण, घरातील पंखे साफ करण्याचा तुमचा त्रास कमी करण्याच्या दृष्टीने आम्ही तुमच्यासाठी अशा काही टिप्स घेऊन आलो आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही अगदी जुन्या पंख्यांवरील धूळ काही मिनिटांत सहज काढू शकाल.
सोप्या उपायांनी पंखा करा चकाचक
क्लिनिंग डस्टर वापरा
पंखा स्वच्छ करण्यासाठी क्लिनिंग डस्टर वापरा. त्यामुळे तुमचा खुर्ची किंवा टेबलावर चढून पंख्यावरील धूळ साफ करण्याचा त्रास कमी होईल. तसेच, या पद्धतीने पंख्यावरील घाण काढून टाकण्यासही मदत होईल. त्यासाठी प्रथम एका बादलीत पाणी, व्हिनेगर व डिटर्जंट मिसळून द्रावण तयार करा. त्यात डस्टर भिजवून, ते पिळून घ्या आणि मग पंखा स्वच्छ करा.
व्हिनेगरने पंख्याची घाण काढा
तुम्ही पंखे स्वच्छ करण्यासाठी व्हिनेगरदेखील वापरू शकता. त्यासाठी व्हिनेगरमध्ये डिटर्जंट मिसळा. ते पंख्यावर लावा आणि स्क्रब म्हणून वापरा. ते काही वेळ पंख्यावर राहू द्या. त्यानंतर ते थंड पाण्याने स्वच्छ करा.
लिंबू आणि डिटर्जंटने पंखा स्वच्छ करा
पंखा नवीन दिसण्याप्रमाणे चमकवण्यासाठी तुम्ही लिंबू आणि डिटर्जंटचाही वापर करू शकता. त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पाणी गरम करावे लागेल. त्यानंतर त्यात लिंबू आणि डिटर्जंट टाका. मग त्या द्रावणाने पंखा पुसून घ्या. काही वेळाने कापड पाण्यात भिजवून पंखा पुन्हा एकदा स्वच्छ करा.