निरोगी राहण्यासाठी शरीरात रक्तपुरवठा व्यवस्थित होणे गरजेचे असते. हृदयातून रक्तपुरवठा झाल्यानंतर शरीरातील सर्व अवयवांना रक्तपुरवठा नीट होतो. जर रक्तदाब योग्य असेल तर हृदयावर ताण पडत नाही, पण जर रक्तदाब वाढला तर हृदयाला त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त काम करावे लागते. तसेच जर रक्तदाब कमी झाला तर याचा अर्थ हृदयाकडुन इतर अवयवांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत आहे. डॉक्टरांच्या मते उच्च रक्तदाबाप्रमाणे कमी रक्तदाबामुळे देखील गंभीर समस्या उद्भवू शकतात.
कमी रक्तदाबामुळे उद्भवणाऱ्या समस्या
कमी रक्तदाबामुळे अवयवांना ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होत नाही, त्यामुळे शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. यामुळे स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका, किडनी निकामी होणे अशा गंभीर समस्या उद्भवू शकतात.
कमी रक्तदाबामध्ये ही लक्षणं दिसतात
कमी रक्तदाबामध्ये चक्कर येणे, थकवा जाणवणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे, हात- पाय थंड पडणे, जेवताना अडचणी येणे अशी लक्षणं दिसतात.
आणखी वाचा : फक्त जेवणामुळे नाही तर ‘या’ आजारांमुळे देखील वाढू शकते वजन; जाणून घ्या यामागचे कारण
रक्तदाब कमी झाल्यास हे उपाय करावे
रक्तदाब कमी झाल्यास थोडे मीठ खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडुन तुम्ही ऐकला असेल. याशिवाय चहा, कॉफी पिऊ शकता, त्यांना ऍसिडिटी ची समस्या आहे त्यांनी चहा, कॉफी पिणे टाळावे. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी देखील चहा, कॉफी टाळावे. खूप वेळ उपाशी राहिल्याने रक्तदाब कमी होण्याची शक्यता असते त्यामुळे रक्तदाब कमी झाल्याचे जाणवल्यास काहीतरी खावे. जास्त त्रास जाणवत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)