How to Create Your Own Makeup Remover : आपल्यातील अनेक तरुणी आणि महिलांना मेकअप करायला भरपूर आवडते. मॉइश्चराइजर, प्रायमर, कन्सीलर, सनस्क्रीन, फाउंडेशन, आयलायनर, लिपस्टिक आदी अनेक गोष्टी मेकअप करताना लावल्या जातात. पण, हा मेकअप लावून दिवसभर बाहेर फिरल्यानंतर तो घरी येऊन, योग्यरीत्या काढून टाकणेसुद्धा महत्त्वाचे असते. जेणेकरून तुमची त्वचा मऊ, चमकदार राहील. त्यासाठी बाजारात मिळणारे मेकअप रिमूव्हर्स महागडे तर असतातच; पण त्यामध्ये अनेक हानिकारक रसायनेही असतात. या रसायनांमुळे तुमची त्वचा कोरडी आणि खडबडीतसुद्धा होऊ शकते.
पण, आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. कारण- घरी उपलब्ध असलेल्या नैसर्गिक गोष्टींद्वारेही तुम्ही तुमचा मेकअप सहज काढू शकता आणि तुमची त्वचा मुलायम व चमकदार बनवू शकता…
मेकअप रिमूव्हर्स म्हणून वापरण्याजोग्या नैसर्गिक वस्तू…
१. ऑलिव्ह ऑईल आणि लिंबू : दोन चमचे ऑलिव्ह ऑइलमध्ये एक चमचा लिंबाचा रस मिसळा. नंतर ते मिश्रण चेहऱ्यावर व्यवस्थित लावा. त्यानंतर पाच मिनिटांनी कॉटन पॅडच्या साह्याने चेहरा पुसून थंड पाण्याने धुवा. तयार केलेले हे द्रावण नैसर्गिक मेकअप रिमूव्हर म्हणून काम करते आणि त्वचा मऊ व चमकदार बनवते.
२. नारळाचे तेल आणि मध : नारळाचे तेल आणि मध वापरून तुम्ही मेकअप सहज काढू शकता. त्यासाठी एक चमचा खोबरेल तेलात अर्धा चमचा मध मिसळून पेस्ट बनवा. त्यानंतर ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. हलक्या हातांनी चेहऱ्याला मसाज करा आणि कॉटन पॅडच्या मदतीने पुसून टाका. नंतर चेहरा थंड पाण्याने धुऊन घ्या.
३. दही आणि बेसन : मेकअप काढण्यासाठी दोन चमचे दह्यात एक चमचा बेसन मिसळून पेस्ट बनवा. त्यानंतर पाच मिनिटे चेहऱ्यावर लावा. आता मसाज करा आणि कोमट पाण्याने चेहरा धुवा. त्यामुळे तुमचा मेकअप तर निघेलच; पण तुमची त्वचाही चमकदार होईल.
४. गुलाबपाणी आणि ग्लिसरीन : गुलाबपाणी आणि ग्लिसरीनचे मिश्रण चेहऱ्यावर स्प्रे करा आणि १५ मिनिटे ते तसेच ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. या मिश्रणामुळे मेकअप सहजपणे काढून टाकला जातोच; पण त्वचा स्वच्छ, चमकदार करण्यासही मदत होते.