परतीच्या पावसानंतर आता हळूहळू सर्वत्र थंडी वाढू लागली आहे. हिवाळा हा अनेकांचा आवडता ऋतू असतो, पण याच दिवसांमध्ये आजारी पडण्याचे प्रमाणही वाढते. हवामानात होणारे बदल, प्रदूषणाची वाढती पातळी, हिवाळ्यात पडणारे धुके यांमुळे श्वसनाशी निगडित समस्या असणाऱ्यांना आणखी त्रास होऊ शकतो. तसेच दम्याचा त्रास असणाऱ्यांना देखील बाहेर न पडण्याचा सल्ला दिला जातो. हिवाळ्यातील बदलणाऱ्या वातावरणामुळे ज्यांना कोणताही त्रास नाही अशा व्यक्तींना देखील श्वसनाचा त्रास होऊ शकतो.
हिवाळ्यात वायरल इन्फेकशन होण्याचे प्रमाण वाढते. थंडी आणि हवामानातील बदलामुळे सतत सर्दी होणे, घशात खवखवणे अशा समस्या उद्भवू शकतात. यापासून सुटका मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय मदत करतात कोणते आहेत ते उपाय जाणून घ्या.
आणखी वाचा : हिवाळ्यात शेंगदाणे करतील निरोगी राहण्यास मदत; जाणून घ्या याचे आश्चर्यकारक फायदे
मिठाच्या पाण्याने गुळण्या करा
मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने घशातील बॅक्टेरिया नष्ट होण्यास मदत होते. यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ पाण्यात टाकून ते नीट मिसळा, त्यानंतर या पाण्याने गुळण्या करा. सकाळी आणि रात्री असे दोन वेळा गुळण्या केल्यास घशातील खवखव दुर होण्यास मदत होईल.
आल्याचा चहा
सकाळी मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्यानंतर तुम्ही आल्याचा कोरा चहा पिऊ शकता. यामुळे घशाला आराम मिळेल आणि सर्दी, खवखव यांपासून सुटका मिळण्यासाठी मदत होईल.
मध
मध घश्याच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी उत्तम घरगुती औषध मानले जाते. चमचाभर मध घेऊन ते खाऊ शकता किंवा कोमट पाण्यात मध टाकून पिऊ शकता. जास्त गरम असणाऱ्या पाण्यात मध टाकून पिणे टाळावे. मध घशाची खवखव कमी करण्यास फायदेशीर ठरेल.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)