Winter Constipation Home Remedies: शौचाच्या समस्या या अनेकांना वर्षभर त्रास देत असतात पण थंडीत याचे प्रमाण काही अंशी अधिक वाढते. याचे मुख्य कारण म्हणजे हवामान थंड असल्याने अनेक जण पाणी पिण्यासाठी टाळाटाळ करतात. किंबहुना शरीराकडूनही आपल्याला तहान लागल्याचे संकेत फार कमीच मिळतात. परिणामी पचनप्रक्रिया नीट होण्यास अडथळा निर्माण होतो. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे थंडीत जर का शरीराची हालचाल झाली नाही तर शरीराला उब देण्यासाठी अधिक शक्ती खर्ची होते त्यामुळे मुळातच शरीरात मलनिर्मिती कमी होते. जितके अनावश्यक घटक शरीरातूनन बाहेर टाकून द्यायचे असतात ते सुद्धा कमी पाण्यामुळे कडक होतात व त्यांना फेकून देणे शरीराला शक्य होत नाही. यामुळेच अनेकांना थंडीच्या दिवसांमध्ये बद्धकोष्ठचा त्रास जाणवतो.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, बद्धकोष्ठ पुढे जाऊन मुळव्याधाच्या आजारात रूपांतरित होऊ शकतो. यामागील मुख्य कारण म्हणजे जेव्हा बद्धकोष्ठ असल्याने शरीरातील मल गोठुन जाते तेव्हा ती शरीराबाहेर टाकण्यासाठी अधिक शक्ती लावावी लागते त्यामुळे गुदद्वाराच्या भागात सूज किंवा दुखणे वाढू शकते. आता या बद्धकोष्ठच्या त्रासावर घरगुती उपाय कसा करावा हे ही जाणून घेऊयात…
गायीचं शुद्ध साजूक तूप
तुपाच्या सेवनाने शरीराला स्निग्ध पोषक तत्व लाभतात. यामुळेच विशेषतः थंडीच्या दिवसात आहारात तुपाचा समावेश करणे फायद्याचे ठरू शकते. तूप हे शरीराला गरम ठेवण्याच्या कामी येते. तसेच यामुळे चयापचय क्रिया वेगवान होऊन फॅट्स वितळण्यासही मदत होते. तुपाचे सेवन आपण आहारात करू शकता त्याशिवाय रात्री झोपण्याआधी गरम पाण्यात साजूक तूप टाकून प्यायल्याने सकाळीच पोट साफ होऊन दिवस उत्साहात जाऊ शकतो.
दूध
रात्री एक ग्लास कोमट दूध पिणे हे केवळ पचनासाठीच नव्हे तर उत्तम झोप लागण्यासाठीही फायद्याचे असल्याचे अनेक तज्ज्ञ सांगतात. तुम्ही शक्य असल्यास दुधातच एक चमचा तूप मिसळून सेवन केले तर आरोग्यासाठी अधिक हिताचे ठरू शकते.
मेथी दाणे
आता हा उपाय वाचून काहीजण नाक मुरडतील मात्र पचनासाठी मेथी दाणे हा बेस्ट पर्याय आहे. शक्य असल्यास मेथीचे दाणे थोडे भाजून ठेवा व रोज सकाळी किंवा रात्री झोपताना काही दाणे चघळू शकता, काहींना कडवट चव अजिबातच आवडत नसेल तर मेथी दाणे पाण्यात उकळून ते पाणी प्यायल्याने सुद्धा परिणाम दिसून येतो.
युरिक ऍसिड वाढताच हात- पाय, चेहऱ्यावर दिसून येते सूज; ‘ही’ आम्लयुक्त फळं देऊ शकतात आराम
ओवा
जेवणानंतर काही वेळाने व झोपण्याआधी काही वेळ ओव्याचे सेवन केल्यास पचनप्रक्रिया जलद होण्यास मदत होते. तसेच तोंडाच्या उत्तम आरोग्यासाठीही याचा फायदा होतो. ओवा हा एक उत्तम मुखवास आहे, तोंडातील जंतूंना मारण्यासाठी ओव्याची मदत होते. ओवा तुम्ही कच्चा चघळून खाऊ शकता अकिंवा ओव्याचे दाणे ग्राम पाण्यात उकरून त्याचे सेवन करू शकता.
(टीप: वरील उपाय हे आयुर्वेदिक व प्राप्त माहितीवर आधारित आहेत, गंभीरपरिस्थितीत वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे ठरेल)