Makar sankranti 2020 Bornan Small Kids : नव्या वर्षाची सुरुवात झाल्यानंतर आता सर्वच जण या वर्षातील पहिल्यावहिल्या सणाला म्हणजेच मकरसंक्रांतीसाठी सज्ज झाले आहेत. १४ जानेवारी आणि काही जण १५ जानेवारीला मकर संक्रांतीचा सण सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. शेतीशी संबंधित या सणादिवशी सूर्यदेवाची विशेष पूजा केली जाते. या दिवशी सूर्यनमस्कार आणि सूर्य मंत्रांचा जप विशेष फलदायी मानला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नदीत स्नान आणि दान करण्याचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. या दिवशी आणखी एक परंपरा असते. या दिवशी लहान मुलांचं बोरन्हाण केलं जातं. हे बोरन्हाण म्हणजे काय आणि कशासाठी ते केलं जातं, किती वर्षापर्यंतच्या लहान मुलाचं बोरन्हाणं केलं जातं, याची तयारी कशी करायची, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आम्ही देणार आहोत. वाचा सविस्तर…
ज्याप्रमाणे संक्रांतीच्या दिवशी महिलांचा हळदीकुंकूचा कार्यक्रम केला जातो, त्याप्रमाणेच लहान मुलांच्या बोरन्हाणीचा देखील कार्यक्रम केला जातो. बाळ जन्माला आल्यानंतर जी पहिली संक्रांत येते, त्या दिवशी लहान मुलांना हे बोरन्हाण घातलं जातं. नवविवाहितेला ज्या पद्धतीने हलव्याचे दागिने घालवून सजवण्यात येतं, अगदी त्याचप्रमाणे लहान मुलांनासुद्धा हलव्याचे दागिने घातले जातात. संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हे कधीही करता येतं. मुलांना काळ्या रंगाचे कपडे घातले जातात. लहान मुलांना आणि जवळच्या नातेवाईकांना बोलावून हा कार्यक्रम केला जातो. लहान मुलांना या बदलत्या ऋतुची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे उदारणार्थ बोर, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा लहान मुलांच्या डोक्यावरुन टाकल्या जातात.
आणखी वाचा – मकर संक्रांतीला तीळ आणि गुळाचे सेवन का करतात? जाणून घ्या यामागचे रंजक कारण
कसं घालायचं बोरन्हाणं?
सर्वात आधी घरात जमिनीवर स्वच्छ कपडा अंथरून घ्या. त्यावर एक पाट ठेवा. तुमच्या बाळाला त्या पाटावर बसवा. त्यानंतर नातेवाईकांकडून तुमच्या लहान मुलाला ओवाळून घ्या. बोर, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा आणि कुरमुरे एकत्र करुन त्याचं बोरन्हाण करा आणि ते लहान मुलाच्या डोक्यावरुन ओतावून घ्या. त्यानंतर कार्यक्रमासाठी आलेल्या लहान मुलांना ते बोरे, गोड- गोड उसाचे पेर, तिळाची बोरे उचलून खाऊ द्यावेत किंवा घरी घेऊन जाण्यासाठी सांगावेत. बोरन्हाण मध्ये वापरण्यात येणारी फळे मुले इतर वेळी खात नाहीत म्हणून बोरन्हाणच्या माध्यमातून ती लहान मुलांच्या पोटात जातात.
आणखी वाचा – Haldi Kunku Gift Ideas: यंदा हळदी-कुंकवासाठी सुवासिनींना ‘वाण’ काय देणार? जाणून घ्या ‘या’ भन्नाट आयडिया
बोरन्हाणं घालताना लहान मुलांना अंगावर लागणार नाही, अशाच गोष्टींचा समावेश करावा. चुरमुरे, लाह्या, छोटी बोरं, चिंचा, गाजराचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, रंगीबेरंगी गोळ्या, हल्लीच्या लहान मुलांच्या आवडीचा विचार करून वेगवेगळी चॉकलेट्स, गोळ्या, बिस्कीटे, हलव्याचे दागिने अशा गोष्टी देखील तुम्ही वापरू शकता.
याला काही भागात बोरलुट असेही म्हणतात. यामध्ये बाळाच्या कौतुकाचा भाग तर आहेच, पालकांची हौसही आहे. अन् त्या त्या ऋतुत येणार्या फळांना चाखण्याची सवय ही बाळांना लावणाचा हा अनोखा प्रयत्न म्हणावा लागेल. शीतळ शिमगा, बोरन्हाण ही त्याचीच प्रतीक आहेत. बाळावर असंच सगळ्यांच्या प्रेमाचा वर्षाव होऊ दे. तो सुबत्तेत न्हाउ दे. कायम बाळगोपाळांनी घेरलेला म्हणजेच सर्वांचा लाडका होउ दे, अशा भावनेने केलेला हा एक संस्कारच होय.
आणखी वाचा – मकर संक्रांतीला पतंग का उडवतात? यामागचे ‘हे’ कारण जाणून तुम्हीही पतंग उडवाल
केवळ करायची म्हणून ही प्रथा नाही तर याला शास्त्रीय कारणंही आहेत. थंडीच्या या दिवसांत हे पदार्थ खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. संक्रातीला सुगड भरताना किंवा बोरन्हाणासाठी उसाचे करवे, बोरं, भुईमुगाच्या शेंगा, तीळ आदींचा उपयोग केला जातो. याचं कारण म्हणजे त्या त्या ऋतूत येणाऱ्या पिकपाण्याचा उपयोग आपण पूर्वापार करत आलो आहोत. बदलत्या ऋतूमानाशी जुळवून घेत शारीरिक आरोग्य राखायचा, असा व्यापक विचारही त्यामागे दिसून येतो.