How To Find Best Coconut: उन्हाळ्यात शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी पाण्याची खूप गरज असते. पाण्यासह अन्यही पोषक सत्व मिळण्यासाठी नारळ पाण्याचे सेवन अत्यंत फायदेशीर ठरू शकते. फक्त नारळ पाणीच नव्हे तर खोबऱ्यातही अनेक मिनरल्स व व्हिटॅमिन असतात. शरीराला फायदे इतकंच नव्हे तर जिभेचे चोचले पुरवण्यासाठी सुद्धा नारळ अत्यंत उपयुक्त फळ आहे. विचार करा, तुम्ही मस्त एखाद्या संडेला चिकन वड्यांचा बेत केला असेल किंवा सकाळच्या नाश्त्याला झणझणीत मिसळ पाव खाल्ला असेल आणि त्यावर तुम्हाला मस्त थंडगार सोलकढीचा ग्लास हातात मिळाला तर. पण आता नारळ पाणी, खोबरं, मलाई या सगळ्यासाठी नारळ योग्य निवडणे गरजेचे असते. आज आपण तुमच्या गरजेनुसार परफेक्ट नारळ कसा निवडायचा हे पाहणार आहोत.
तुम्हाला नारळ पाणी जास्त हवे असल्यास… (How To Find Tender Coconut)
१) शहाळं हिरवेगार असल्यास उत्तम, यावर शक्यतो ब्राऊन किंवा पिवळे डाग असल्यास शहाळं अधिक पिकलेलं असू शकतं.
२) साधारण गोल आकाराचे शहाळे निवडण्याचा प्रयत्न करा
३) तुम्ही शहाळं हलवून पाहिल्यास जर आतून पोकळ आवाज आला तर त्यात पाणी कमी असू शकते.
४) शहाळ्याच्या वरची व खालची बाजू किंचित दाबून पहा, जर हा भाग नरम असेल किंवा बोटाने दाबला जात असेल तर असे शहाळे घेणे टाळा.
तुम्हाला खोबरं जास्त हवं असल्यास…
१) नारळ घेताना एखाद्या अंगठीने किंवा नाण्याने वाजवून पाहा, पोकळ आवाज येत असल्यास खोबरे कमी असू शकते.
२) नारळ किंचित हलवल्यास पाणी जास्त असेल तर खोबरं कमी आहे असे समजून जा
३) नारळ स्वतः निवडा. सहसा दुकानदार नारळ देतात तेव्हा आकाराने मोठे फळ देतात पण त्यात शेंडीचा भागच अधिक असू शकतो.
हे ही वाचा<< संत्री गोड आहे की आंबट कसे ओळखाल? संत्र्यावर निसर्गाच्या ‘या’ पाच खुणा पाहून सेकंदात करा परीक्षा
नारळपाणी हे रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यास उपयुक्त असते. आपण वजन कमी करण्याच्या मोहिमेवर असल्यासही नियमित नारळ पाण्याच्या सेवनाचा फायदा होऊ शकतो. उत्तम नारळ निवडण्यासाठीच्या वर दिलेल्या टिप्स वाचून तुम्हीही योग्य निवड कराल अशी अपेक्षा. तुमच्याकडेही अजून अशा काही टिप्स असतील तर कमेंट्समध्ये आवश्य कळवा.