अनेकजण तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे त्रस्त असतात. यापासून सुटका मिळवण्यासाठी माऊथ फ्रेशनर किंवा केमिकलयुक्त माऊथवॉशचा वापर केला जातो. पण यामुळे कधीकधी तात्पुरता फरक दिसतो, आणि थोड्या वेळाने पुन्हा हा त्रास जाणवू लागतो. त्यामुळे आजकाल सतत माऊथवॉश वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. पण माऊथवॉश वापरण्याचे फायद्यांबरोबर काही तोटे देखील असतात. काय आहेत माऊथवॉश वापरण्याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या.
माऊथवॉश वापरण्याचे फायदे
दातात लागणारी किड माऊथवॉश वापरल्याने टाळता येऊ शकते. माऊथवॉश वापरल्याने दात आणि हिरडयांमध्ये प्लाक जमा होत नाही, तसेच तोंडातील बॅकटेरिया नष्ट करण्यास मदत होते. यासह नियमितपणे माऊथवॉश वापरल्यामुळे श्वासातील दुर्गंधी कमी होते.
आणखी वाचा : तमालपत्र आरोग्यासाठी ठरते गुणकारी! जाणून घ्या याचे आश्चर्यकारक फायदे
माऊथवॉश वापरण्याचे तोटे
अनेकजाण माऊथ वॉश वापरल्यानंतर तोंडाची चव बिघडते अशी तक्रार करतात. सतत माऊथवॉश वापरल्यानंतर तोंडात कोरडेपणा जाणवतो आणि सतत तहान लागते. तसेच माऊथवॉश वापरल्यामुळे काही जणांना एलर्जीचा त्रास होऊ शकतो.
असे माऊथवॉश वापरण्याचे काही फायदे आणि तोटे आहेत. हे टाळण्यासाठी तुम्ही नैसर्गिक माऊथवॉशचा वापर करू शकता. कोणते आहेत नैसर्गिक माऊथवॉश जाणून घ्या.
बेकिंग सोडा माऊथवॉश
‘नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन’च्या एका अभ्यासात बेकिंग सोडा दातांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे नमूद करण्यात आले आहे. दातांच्या समस्यांसाठी बेकिंग सोडा नैसर्गिक उपाय मानले जाते. चहा किंवा अन्य पेयांमुळे तोंडात बॅक्टेरिया तयार होऊ शकतात त्यापासून सुटका मिळवण्यासाठी बेकिंग सोडा उपयुक्त मानले जाते. बेकिंग सोडा माऊथवॉश तयार करण्यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा बेकिंग सोडा टाका. ते पाण्यात पूर्णपणे व्यवस्थित मिसळा. नंतर या पाण्याने चूळ भरा. सकाळी दात घासल्यानंतर तुम्ही या माऊथवॉशचा वापर करू शकता.
आणखी वाचा : पायांच्या स्नायूंमध्ये सतत वेदना जाणवतात का? ‘हे’ सोपे उपाय करून पाहा लगेच जाणवेल फरक
एलोवेरा माऊथवॉश
एलोवेरा दातांसाठी उत्तम औषध मानले जाते. दाताला जर किड लागली असेल तर ती पसरू नये, तसेच हिरडयांमधून रक्त येत असेल तर ते थांबवण्यासाठी एलोवेरा फायदेशीर ठरते. हे माऊथवॉश तयार करण्यासाठी अर्धा ग्लास पाण्यात अर्धा ग्लास एलोवेराचा रस मिसळा. सकाळी दात घासल्यानंतर या पाण्याने चूळ भरा
नारळाचे तेल
दात किडण्यापासून रोखण्यासाठी नारळाचे तेल उपयुक्त ठरते. नारळाचे तेल वापरल्याने दात स्वच्छ होण्याबरोबरच, दात चमकण्यासही मदत होते. याचा माऊथवॉश म्हणून वापर करण्यासाठी थोडे खोबरेल तेल घ्या आणि दात व हिरड्यांवर ते ५ मिनीटांपर्यंत व्यवस्थित चोळा, नंतर साध्या पाण्याने चूळ भरा.
आणखी वाचा : सोन्या-चांदीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स; दिवाळीत दिसतील अगदी नव्यासारखे!
मीठ
मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने घशातील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत मिळते. मिठाचा माऊथवॉश म्हणून वापर करण्यासाठी अर्धा ग्लास पाण्यात अर्धा चमचा मीठ टाकून त्या पाण्याने गुळण्या करा. मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे तोंडाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)