How To Get Rid Of Coffee Addiction: सकाळी उठल्यावर आधी कॉफी मग बाकी असा पवित्र घेऊन जर आपणही प्रत्येक दिवसाची सुरुवात करत असाल तर वेळीच सावध व्हा. चवीला व तुमच्या दिवसाला एक किक स्टार्ट देणारी कॉफी ही आतड्या, हृदय ते अगदी मेंदूसाठी सुद्धा घातक ठरू शकते. आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार दिवसातून तीन-चार वेळा कॉफी किंवा अन्य कोणत्याही उत्तेजक पेयांचे सेवन हे तुमच्या शरीरासाठी धोकादायक असते. यातून आपण आपल्या शरीराला सतत साखरेची सवय लावत असता. साखरेच्या अतिसवयीमुळे होणारे नुकसान वेगळे सांगायला नको. या सगळ्यावर उपाय म्हणजे… नाही! कॉफी बंद करायला सांगणार नाही, उलट आज आपण अशी रेसिपी पाहणार आहोत ज्यामुळे तुमचं कॅफिनचं व्यसन सुद्धा नियंत्रणात ठेवू शकता.
जर का आपण ब्लॅक कॉफी घेत असाल तर कॅफीनचे अधिक प्रमाण शरीरात गेल्याने सतत अस्वस्थ वाटणे, डोकेदुखी, पित्त असे अनेक त्रास उद्भवू शकतात. जर आपण अचानक कॉफी बंद केलीत तर शरीराकडूनच सतत कॉफीची मागणी होईल. क्रेव्हिंगमुळे अनेकदा कामातही लक्ष लागत नाही. अशावेळी ही विना कॉफी बीन्स बनवलेली कॉफीची पावडर नक्की कामी येईल. चला तर रेसिपी पाहुयात.
Video: कॉफी प्या आणि Cups खा! कुकीज कपची ही भन्नाट रेसिपी घरी ट्राय करून बघाच
कॉफी पावडर बनवण्याची पद्धत
- तव्यावर अगदी मंद आचेवर तेल न टाकता छोले भाजून घ्या. छोले गडद तपकिरी होईपर्यंत किमान २० मिनिटे सतत परतून घ्या
- गडद चॉकलेटी किंवा तपकिरी रंग आल्यावरच गॅस बंद करा, अन्यथा तुम्हाला कॉफीची चव मिळणार नाही.
- थोडे थंड झाल्यावर छोले मिक्सरला फिरवून बारीक करून मग चाळून घ्या
- वर जो चाळ शिल्लक राहतो तो पुन्हा एकदा मिक्सरला लावून बारीक वाटून चाळून घ्या. ही प्रक्रिया तीन वेळा करा
- चाळलेली पावडर फ्रीजमध्ये एअर टाईट कंटेनरमध्ये ठेवा.
कॉफी बनवण्याची रेसिपी
नारळाचे दूध, खजूर आणि कॉफी पावडर ब्लेंडरमध्ये फिरवून घ्या आणि छान बर्फ घालून कोल्ड कॉफी ग्लास मधून सर्व्ह करा. आपण नियमित पद्धतीने हेच पदार्थ वापरून गरम कॉफी सुद्धा बनवू शकता
प्रसिद्ध युट्युबर सात्विक मूव्हमेंट यांनी ही रेसिपी तयार केली असून त्यांच्या या अनोख्या पद्धतीला अनेक खवय्यांनी पसंती दर्शवली आहे. विशेषतः नारळाचे दूध व खजूर वापरल्याने प्रक्रिया केलेल्या साखरेचे प्रमाण या कॉफी मध्ये शून्य होते. मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी सुद्धा ही कॉफी उत्तम पर्याय ठरते.