सगळ्यांनाच माहीत असतं की, हिवाळा जवळ आल्यावर आपल्या केसांच्या समस्या वाढण्यास सुरुवात होते. केसांचा कोरडेपणा, केस तुटणे, डोक्यात कोंडा होणे अशा कितीतरी गोष्टींचा सामना आपल्याला करावा लागत असतो. आता या वातावरणामध्ये नेमके काय केले तर केस सांभाळण्यास मदत होईल, असा प्रश्न असतो. कारण- केस स्वच्छ ठेवण्यासाठी आपण ते सतत धुऊनही चालत नाही. आपल्या या समस्येवरचे अनेक उपाय आपल्या घरात वा स्वयंपाकघरातच दडलेले असतात. त्यांचा योग्य वापर कसा करायचा ते मात्र माहीत असायला हवे.
घरगुती वस्तू, पदार्थ वापरून आपण थंडीच्या दिवसांत डोक्यामध्ये होणाऱ्या कोंड्याची समस्या कमी करण्यासाठी हे उपाय करू शकतो. त्यासाठी काय करायचे ते पाहा.
कोंडा घालवण्यासाठी पाच घरगुती उपाय
१. कोरफड
केस आणि त्वचेसाठी कोरफड किती उपयुक्त असते हे तुम्हाला माहीतच असेल. या कोरफडीमध्ये असणारे घटक विशेषतः हिवाळ्यात केसांसाठी अधिक फायदेशीर असतात. मग या कोरफडीचा
उपयोग कसा करायचा? तर, कोरफडीचा ताजा गर घेऊन तो आपल्या डोक्यावर अन् केसांच्या मुळाशी लावून, छान मसाज करून घ्या. २० ते ३० मिनिटांसाठी तो तसाच राहू द्या. नंतर केस शाम्पूने धुऊन टाका. हा मास्क तुम्ही अंघोळ वा शाम्पू करण्याआधी लावावा. आठवड्यातून दोनदा याचा वापर तुम्ही करू शकता. त्यामुळे तुमच्या केसांच्या मुळांना थंडावा आणि ओलावा मिळतो.
हेही वाचा : हिवाळ्यात केस निरोगी अन् चमकदार राहण्यासाठी टाळा फक्त ‘या’ लहान चुका; काय करावे अन् काय करू नये, टिप्स पाहा
२. मेथी
एका बाऊलमध्ये दही, त्रिफळा पावडर व मेथी पावडर मिसळून, त्याचे मिश्रण बनवून ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी हे मिश्रण डोक्याला तासभर लावून ठेवा. नंतर शाम्पूने केस धुऊन टाका. हा प्रयोग तुम्ही आठवड्यातील दोन दिवस करू शकता, अशी माहिती न्यूज १८ डॉट कॉमच्या एका लेखावरून समजते.
३. तेल मालिश
हिवाळ्यात केसांना कोमट तेलाने मसाज करणे हा कोंडा घालवण्याचा अतिशय सोपा व उपयुक्त उपाय आहे. त्यामुळे तुमच्या केसांना पोषण मिळून, त्यांचे आरोग्य सुधारते. त्यासाठी एका लहानशा भांड्यात तुम्हाला आवडते ते तेल आणि इसेन्शियल तेलाचे काही थेंब टाकून एकत्र करा. मग हे तेल हलकेसे गरम करून, त्याने तुमच्या डोक्याला मसाज करून घ्या. मसाज केल्यामुळे तेथील रक्तप्रवाह चांगला होतो.
४. औषधी वनस्पती
पाण्यामध्ये रोजमेरी, थाईम किंवा सेज यांसारख्या औषधी वनस्पती [हर्बल पदार्थ] काही मिनिटांसाठी उकळून घ्या. हे पाणी उकळून झाले की थंड होऊ द्या. शाम्पू लावल्यानंतर या पाण्याचा वापर तुम्ही केस धुण्यासाठी करू शकता. डोक्यावरील कोरडी त्वचा, कोंडा यांसारख्या गोष्टींवर हर्बल वॉश फायदेशीर ठरू शकतो.
५. कडुनिंब आणि आवळा
एका बाऊलमध्ये कडुनिंबाची पावडर आणि आवळा पावडर कोरफडीच्या गरासोबत मिसळून एक हेअर पॅक बनवून घ्या. हा पॅक केसांना ३० मिनिटांसाठी लावून ठेवा आणि नंतर तो पाण्याने धुऊन टाका. हा पॅक तुमच्या केसांमधील कोंडा दूर करण्यासोबतच त्यांना पोषण देतो आणि हायड्रेट ठेवण्यास मदत करतो.
[टिप्स : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित असून, यास वैद्यकीय सल्ला समजू नये.]