पावसाळ्याचा ऋतू कितीही सुंदर असला तरी पावसाळी वातावरणात आरोग्याच्या समस्या वाढण्याची शक्यता असते. त्यात पावासाळ्यात माश्यांचे प्रमाण खूप वाढते. आसपास घोंगवणाऱ्या माश्यांमुळे आपल्याला नको नको होते. माशी काही डासाप्रमाणे दंश करत नाही मात्र, त्यांचा त्वचेला होणारा स्पर्शच इतका त्रासदायक असतो की स्वस्थ बसलेल्या व्यक्तीला सुद्धा त्यांचा वैताग येतो. मग झोपलेल्या माणसाला माश्यांचा काय त्रास होतो असेल, ते विचारू नका. घरात असो वा बाहेर माश्यांमुळे तुमचे काम नीट होत नाहीत. दुसरं म्हणजे जिथे माश्या वावरतात ,तिथे अस्वच्छता आहे, घाणीचे साम्राज्य आहे असा एक आपला समज असतो, जो योग्यच आहे. त्यामुळे माश्या हे अस्वच्छतेचे – अनारोग्याचे प्रतीक बनल्या आहेत.
मुख्यत्वे आतड्यासंबंधित उलट्या,पोटदुखी,जुलाब वगैरे तक्रारींना जबाबदार असते. एकंदर पाहता आतड्याचे जुलाब, आमांश, टायफ़ॉईड, कॉलेरा, कृमी(जंत) यांसारखे आतड्यांचे आजार, डोळ्यांचे विशिष्ट आजार जसे-ट्रॅकोमा व डोळ्यांची साथ (एपिडेमिक कन्जक्टावायटिस) आणि पोलिओमायलायटिस व विशिष्ट त्वचेचे संसर्गजन्य आजार माश्यांमुळे संभवतात, असे जागतिक आरोग्य संघटने (WHO)च्या घरगुती माशा(हाऊसफ़्लाईज) वरील रिपोर् मध्ये म्हटले आहे. म्हणून माश्या घालवण्यासाठी आपलं घर आणि परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. याबाबत डॉ. अश्विन सावंत यांच्याबरोबर संपर्क साधला असता त्यांना लोकसत्ताला माशा घालवण्यासाठी काही सोपे उपाय सांगितले आहेत
माश्यांना प्रतिबंध करण्याचे उपाय कोणते ते जाणून घेऊ
१. घरात माश्यांचे प्रमाण वाढले की सर्वप्रथम यांचे ठिकाण शोधावे लागते. ज्याअर्थी माश्या वाढल्या आहेत त्याअर्थी साधारण ५०० ते ८०० मीटरच्या अंतरामध्ये कुठेतरी त्यांचे वसतीस्थान आहे, हे समजून जा आणि त्या स्थानाचा शोध घ्या. हे स्थान कोणते असू शकतात तर मानवी मल, प्राण्यांचा मल, फेकलेले अन्न, उकिरड्यावर टाकलेले अन्न, मेलेला प्राणी वा पक्षी वा किडे इ., चिखल- घाण वगैरे अस्वच्छ जागा शोधा, ज्यावर माश्यांचे पोषण होते.
२. एकदा माश्यांचे वसतीस्थान मिळाले की, अन्नपदार्थ, उकिरडा, मेलेला प्राणी, पक्षी किडे, घाण वगैरे काढून टाकण्याची व्यवस्था करा आणि ती जागा स्वच्छ करा. साफसफाई केल्यानंतर ती जागा डीडीटी पावडर टाकून घासून साफ करा किंवा बोरॅक्स आणि पाण्याच्या मिश्रणाने धुवून काढा. त्यामुळे माश्या आपल्या इतर माश्यांना मागे येण्यासाठी जी केमिकल्स सोडतात, ते वाहून जाईल आणि नवीन माश्या येणे थांबेल.
घरामध्ये वा ऑफिसमध्ये लिंबू, निलगिरी,लवंग, लॅवेन्डर या तेलाचे थेंब टाका किंवा त्याची बाटली मध्यवर्ती जागेमध्ये वास दरवळेल अशी ठेवा.
३. घरातल्या, ऑफिसमधील मध्यवर्ती जागेमध्ये १२-१४ लवंग किंवा कापूर ठेवा, ज्याचातीव्र गंध माश्यांना आत येण्यास प्रतिबंध करेल.
४. व्होडका या मद्याचे थेंब टाकलेले कापड वा रुमाल खिडक्या-दारांवर ठेवा किंवा व्होडका भरलेली लहानशी बॅगमध्ये लटकत ठेवा .का कुणास ठाऊक,पण व्होडकाच्या वासामुळे माश्या दूर पळतात.
५. एक कप पाण्यामध्ये ५० थेंब निलगिरी तेल टाका आणि व्यवस्थित ढवळा. हे मिश्रण त्वचेवर लावल्यास माश्या त्वचेवर बसत नाहीत. निलगिरी तेलाऐवजी लॅव्हेंडर ऑईलसुद्धा वापरता येईल. मात्र या मिश्रणाचा तुमच्या डोळ्यांशी संपर्क येणार नाही, याची खबरदारी घ्या.
६. विशिष्ट औषधी रोपे घरात वा ऑफिसमध्ये लावल्यानेही माश्या आत शिरत नाहीत.जसे- तुळस,पुदिना,लॅवेंडर वगैरे.
हे ही वाचा – जीमला न जाताही वजन कमी करता येते; फक्त ‘या’ सवयी बदला, वजन होईल कमी
७. घरामध्ये धूर करा. धूर माश्यांना अजिबात सहन होत नाही. निखारे किंवा करवंट्या जाळून त्यावर ऊद, अगुरु, गुग्गुळ, लसणीच्या पाकळ्या, ओवा, बाळंतशेप, वावडिंग, सुकी तुळशीची वा कडूनिंबाची पाने वगैरे वस्तू टाकून ( वा यातल्या जितक्या मिळतील तितक्या टाकून) त्याचा धूर करा.माश्या तर दूर राहतीलच, शिवाय हा धूर घरातल्या रोगजतुंचा सुद्धा नायनाट करेल.
८. माश्यांना अडकवण्यासाठी पुढीलप्रमाणे सापळा तयार करा: एका ग्लासामध्ये साखरेचे पाणी ठेवा,त्या ग्लासवर कागदाचा कोन ठेवा.(कोन आईस्क्रीम असते ना तसा आकार कागदाला द्या. कोनाची निमुळती बाजू माशी जेमतेम आत शिरेल इतपत मोठी ठेवा. ही निमुळती कोनाकडची बाजू ग्लासमध्ये खालच्या बाजुला आतल्या गोड द्रावणाला टेकेल न टेकेल अशी ठेवा व गोलाकार बाजू वरच्या बाजुला राहू द्या. माश्या साखरेच्या आमिषाने गोलाकार कागदावरुन घसरत आत जातील व गोड द्रावाशी संपर्क आल्यावर पुन्हा वर येऊ शकणार नाहीत.
९. अनेक जण एका कागदाला थोडा गूळ चिकटवून ठेवतात, जेणेकरून सर्व माश्या त्या गुळाला चिकटून राहतात आणि आपल्याला त्रस्त करत नाहीत. मात्र हा कागद शक्यतो घराच्या परसात,जरा बाहेरच्या बाजुला वा खिडकीजवळ ठेवा. कसेही असले तरी ते दृश्य मात्र हिणकस दिसते.
१०. बाजारात फ़्लाय पेपर्स मिळतात त्यांचा वापर करा. फ्लाय पेपर्सना गोड वासाचे द्रावण लावले असते, जे अनेकदा विषारीसुद्धा असते. त्यामुळे माश्या त्या कागदावर जमतात आणि मरून जातात.
हेही वाचा- तुम्हाला बीअरविषयी ‘या’ १० मजेदार गोष्टी माहितीये का? नसेल एका क्लिकवर जाणून घ्या
११. माश्यांना प्रत्यक्षात ठार मारणे हासुद्धा एक उपाय आहे, ज्यासाठी पेपरची गुंडाळी, रबरबॅण्ड,फ़्लाय स्वॅटर (डास-माश्या मारण्यासाठी बाजारात मिळणारे
बॅडमिंटनच्या रॅकेटसारखे साधन) वापरता येईल.
१२. घरात माश्या शिरू नयेत खिडक्या बंद ठेवणे, खिडक्यांना उभ्या पट्ट्यांप्रमाणे असणारे आकर्षक रंगाचे बॅण्ड लावणे, खिडकीवर पारदर्शक पातळ पडदे सोडणे वगैरे उपाय करता येतील.
घरादाराची स्वच्छता हाच माश्य़ांना दूर ठेवण्याचा महत्त्वाचा प्रतिबंधक उपाय आहे, हे विसरू नये.