How to Grow Curry Leaves at Home: अशा अनेक गोष्टी जेवणात वापरल्या जातात, ज्यामुळे जेवणाची चव वाढते. कढीपत्ता हा यापैकी एक आहे, ज्याचा वापर विशेषतः अन्न सुगंधित आणि चवदार बनवण्यासाठी केला जातो. जेवणाची लज्जत वाढवण्यासाठी कढीपत्त्याचा वापर भारतीय जेवणात होतो. कढीपत्ता फक्त अन्नाची चवच वाढवत नाही, तर त्याशिवायही त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. कढीपत्त्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि अनेक पोषक घटक असतात. अशा या बहुगुणी व फायदेशीर कढीपत्त्याचं अनेकांच्या घरी झाड असतं; तर काही लोक गरजेनुसार तो विकत घेतात. हा कढीपत्ता घराच्या परिसरातही उगवता येऊ शकतो. तुम्हालाही घरात झाडे लावण्याची आवड आहे का? जर तुम्हालाही घरगुती बागकाम आवडत असेल तर तुम्ही तुमच्या घरी कढीपत्ता लावू शकता. चला जाणून घेऊया कढीपत्ता लावण्याची योग्य पद्धत.
कढीपत्त्याचे रोप कसे लावायचे?
कढीपत्त्याच्या झाडाची लागवड करण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे वसंत ऋतू. कढीपत्ता लावायचा असेल तर एकतर तुम्ही बियांची मदत घेऊ शकता किंवा कढीपत्त्याच्या झाडाची कलमे घेऊन किंवा रोपातील बिया काढून ते वाढवू शकता. घरी कढीपत्ता लावायचा असेल तर सर्वप्रथम एका भांड्यात माती भरावी लागेल. आता तुम्हाला नर्सरीतून चांगल्या प्रतीचे रोप विकत घ्यावे लागेल आणि नंतर हे रोपटे कुंडीत लावावे लागेल.
चांगली काळजी घेणे महत्त्वाचे
कढीपत्ता रोपाच्या मुळांना मातीने चांगले झाकून ठेवा आणि नंतर भांड्यात थोडे पाणी घाला. रोपाच्या वाढीसाठी त्याची चांगली काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. कोणत्याही झाडाला वाढण्यासाठी योग्य सूर्यप्रकाश हवा असतो, त्यामुळे कढीपत्त्याचे झाड बहरावे यासाठी कढीपत्त्याच्या झाडाला व्यवस्थित सूर्यप्रकाश मिळेल अशा जागी ते ठेवा.
झाडाला खत आणि पाणी योग्य प्रमाणात मिळाले तरच त्याची वाढ होते. पावसाळ्यात या कढीपत्त्याच्या झाडाला जास्त पाणी देणे टाळावे. तुम्ही खत म्हणून शेणखताचा वापर करू शकता. त्याचबरोबर कढीपत्त्याला आम्लयुक्त माती लागते. त्यासाठी ताक हे कढीपत्त्यासाठी सर्वोत्तम खत मानलं जातं. कढीपत्त्याच्या रोपात ताक घातल्यास कढीपत्ता हिरवागार आणि वेगाने वाढण्यास मदत होते. तसेच कढीपत्त्याला किड लागण्यापासून त्याचे संरक्षण होऊ शकते. याचप्रमाणे धुवून सुकवलेली चहापावडरसुद्धा कढीपत्त्यासाठी पोषक असते. परंतु, या दोन्ही वस्तू एकाच वेळी टाकायच्या नाही. एक वस्तू टाकल्यानंतर किमान दोन ते तीन आठवड्यानंतर एक वस्तू खत म्हणून मातीत मिसळायची आहे. त्याचप्रमाणे कढीपत्त्याच्या झाडाची छाटणी करण्यास विसरू नका.
(हे ही वाचा : रात्री झोपण्यापूर्वी ओव्याचे पाणी पिण्याचे अमृतासमान फायदे; पाहा शरीरात कोणते बदल होतात? )
येथे पाहा व्हिडीओ
३० दिवसांत रोप वाढण्यास सुरुवात
जर तुम्ही या रोपाची दररोज काळजी घेतली आणि त्यांना कीटकांपासून सुरक्षित ठेवले तर तुम्हाला अवघ्या ३० दिवसांत झाडाची वाढ दिसू लागेल. सुमारे दोन-तीन महिन्यांत तुमची कढीपत्ता वनस्पती पूर्णपणे वाढेल आणि तुम्ही या वनस्पतीची पाने घरी वापरू शकाल.