Gardening Tips: जिथे मोगऱ्याचे झाड असते, ती जागा सुगंधाने अक्षरशः दरवळून जाते. मोगऱ्याचा सुगंध दिवासभराचा थकवा दूर करू शकतो, इतकेच नव्हे तर साज शृंगारामध्ये देखील मोगऱ्याचा गजरा आवर्जून माळला जातो. विशेष म्हणजे महिलावर्गात मोगरा इतका पसंत केला जातो की, अगदी प्रत्येक समारंभात मोगऱ्याचा गजरा आपल्या केसात माळण्याची लगबग त्यांच्यामध्ये पाहायला मिळते. केवळ मोगऱ्याच्या कळ्याच नाही तर मोगऱ्याची सुगंधी अत्तरे देखील खूप पसंत केली जातात. शिवाय सण उत्सवाला, तसेच स्वागत समारंभांसाठी मोगऱ्याच्या फुलांची सजावट केली जाते.

अनेकदा लोक ही इच्छा पूर्ण करायला हौसेने मोगऱ्याची रोपं आणतात, कुंडीत लावल्यावर नाही म्हणायला चार कळ्यांना, चार फुलं येतात सुद्धा पण नंतर रोपं नुसती भरभर वाढतच जातात. नक्की हे मोगऱ्याचंच रोप आहे ना असा प्रश्न पडावा इतकी त्याची अवस्था होते. पण आज आपण एक असा सोपा जुगाडू उपाय पाहणार आहोत, ज्यामुळे अगदी लहानश्या कुंडीत सुद्धा तुम्ही मोगऱ्याचं रोप वाढवू शकता आणि फक्त पानं नाही तर कळ्यांनी सुद्धा रोप भरून टाकू शकता. चला तर मग पाहूया. थोडक्यात काय तर मोगरा उत्सवाचे आणि आनंदाचे प्रतीक आहे, त्यामुळे आयुष्य आनंदी आणि सुगंधी बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या घरच्या अंगणात मोगरा फुलवू शकता. आणि यासाठी विशेष मेहनतीची देखील गरज लागत नाही.

@Green_Gold_Garden या यु ट्यूब चॅनेलद्वारे शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओच्या मदतीने तुम्ही मोगऱ्याची खूप सारी फुल उगवू शकतात. यामध्ये दोन रुपयांचे खडू घेण्यात आले असून त्याची पावडर वापरण्यात आली आहे.
खडूमध्ये भरपूर कॅल्शियम असते जे मोगऱ्याच्या वाढीसाठी पूरक आहे. त्यामुळे खडूचे बारीक तुकडे करून कुंडीतल्या मातीमध्ये टाकले. त्यानंतर पाणी घातलेले दिसून येते. जेणेकरून खडूचा एकूण सार मातीमध्ये मिक्स होतो. असे केल्यानंतर नियमित मोगयाच्या रोपाला पाणी देण्यास विसरू नका. काही दिवसांतच मोगऱ्याचे रोप चांगले बहरून आलेले तुम्हाला दिसून येईल.

मोगऱ्याच्या रोपाला किती पाणी घालावे?

खडूचे खत टाकून झाल्यावर काही दिवसात तुम्हालळा मोगऱ्याला कळ्या आल्याचे दिसून येईल. जेव्हा अशा कळ्या दिसू लागतील तेव्हापासून आपण रोपात पाण्याचे प्रमाण थोडे कमी करू शकता. जेव्हा आपण भरभरून पाणी घालता तेव्हा त्याचा फायदा पानांच्या व फांद्यांच्या वाढीला होतो त्यामुळे रोप कदाचित भरून पानांनी भरून जाईल पण कळ्या अगदी मोजक्या येतील. हे टाळण्यासाठी अगदी जोपर्यंत मातीचा पृष्ठभाग सुकत नाही तोपर्यंत सतत पाणी घालू नये. यामुळे कळ्यांच्या वाढीला मदत होते.