Milk Adulteration: प्रत्येक भारतीय घरामध्ये दूध हा पदार्थ नानाविध कारणांसाठी वापरला जातो. लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांपर्यंत सर्वांच्या आहारामध्ये दुधाचा समावेश असतो. दुधाचे सेवन करणे शारीरिक वाढीसाठी फायदेशीर असते. यामध्ये असलेल्या पौष्टिक घटकांमुळे लहान मुलांना सतत दूध पाजले जाते. दही, लोणी असे पदार्थ दुधापासून बनवले जातात. याशिवाय चहा, कॉफी, मिठाई बनवतानाही दुधाचा प्रामुख्याने वापर केला जातो. दैनंदिन आयुष्यामध्ये आवश्यक असलेल्या या पदार्थामध्ये लोक भेसळ करत असतात. अशा भेसळयुक्त दुधाचे सेवन केल्याने किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ खाल्याने शरीराला अपाय होऊ शकतो. हा त्रास होऊ नये यासाठी खरेदी केलेल्या दुधामध्ये भेसळ करण्यात आलेली नाही ना हे तपासणे गरजेचे असते.
भेसळयुक्त दूध कसे ओळखावे?
माल्टोडेक्सट्रिन पावडर, रिफाइंड ऑईल आणि हायड्रोजन पेरोक्साइड हे घटक दुधामध्ये मिसळून त्यात भेसळ केली जाते. दुधाचा वास घेऊन किंवा त्याची चव घेऊन त्यात भेसळ झाली आहे की नाही हे ओळखता येते. भेसळ असलेले दूध शुद्ध दुधाच्या तुलनेत पातळ असते. भेसळयुक्त दुधाची चवदेखील वेगळी असते. याव्यतिरिक्त आणखी काही गोष्टींच्या मदतीने दुधाची शुद्धता तपासता येते.
आणखी वाचा – आहारवेद: अमृतासम दूध
दुधाची शुद्धता तपासण्यासाठी पुढील ट्रिक्सची मदत घेता येईल.
१. दुधाची शुद्धता तपासण्यासाठी सर्वप्रथम दुधाचे काही थेंब जमिनीवर टाकावेत. जमिनीवर टाकलेल्या थेंबाकडे थोळा वेळ लक्ष द्यावे. दुधाचे थेंब जमिनीवर पांढऱ्या रंगाच्या खुणा दिसत असेल, तर ते दुध शुद्ध आहे. जर हे थेंब खाली पडल्यावर लगेच वाहू लागले, तर त्या दुधामध्ये भेसळ आहे हे समजून जावे.
२. लिटमस पेपरचा वापर करुन तुम्ही दुधाची तपासणी करु शकता. दुधाचे २-३ थेंब लिटमस पेपरवर टाकावेत. जर दुधामध्ये यूरियाचा समावेश असेल, तर लिटमस पेपरचा लाल रंग बदलून निळा होईल. रंगामध्ये बदल झाला नाही, तर दुधात भेसळ केलेली नाही असे म्हटले जाते.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)