How to Identify Chemically Injected Watermelon: साधारण ९२ % पाणी असणाऱ्या कलिंगडाला उन्हाळयात सुपरफूडचा दर्जा दिला जातो. शरीराचे तापमान स्थिर राखण्यापासून ते एकंदरीत सुदृढ आरोग्याला चालना देण्यापर्यंत अनेक गोष्टींसाठी कलिंगडाचे फायदे अनन्यसाधारण आहेत. अगदी एक कलिंगड सुद्धा तुम्हाला वजन, साखर, डिहायड्रेशन सगळं कमी करण्यासाठी मदत करू शकतो. पण म्हणतात ना एखाद्या गोष्टीची मागणी वाढली की त्यात सरसकट भेसळ होण्याचं प्रमाणही वाढतं. कलिंगडाच्या बाबतही ही गोष्ट लागू होते. तुम्हीच सांगा कलिंगड घेताना कोणती अशी बाब आहे जी तुम्हाला सर्वात लक्षवेधी वाटते? हो, अगदी बरोबर, लाल चुटुक रंग!
ग्राहकांची हीच आवड लक्षात घेऊन अनेकदा कलिंगड पिकवताना त्याला अगदी लाल रसाळ रंग येईल यासाठी सुया टोचून केमिकल्सचा वापर केला जातो. मागणीनुसार पुरवठ्याची गणिते जुळवताना कलिंगडाची वाढ वेगाने व्हावी यासाठी नायट्रेट, कृत्रिम रंग, ऑक्सिटोसिन सारखी रसायने वापरली जातात, जी वैद्यकीय दृष्ट्या मानवी शरीरासाठी अत्यंत घातक आहेत. यामुळे आतड्यावर भीषण परिणाम होऊ शकतो. आता आपल्याला समस्या तर लक्षात आली पण आता यावर उपाय काय? आज आपण कलिंगड हा रसायने वापरून, सुया टोचून पिकवला आहे का हे ओळखण्यासाठी काही सोपे उपाय पाहणार आहोत.
नैसर्गिक, भेसळ नसलेला कलिंगड कसा ओळखावा?
पांढरी पावडर तपासा: बऱ्याच वेळा तुम्हाला कलिंगडाच्या पृष्ठभागावर पांढरी आणि पिवळी पावडर दिसेल. तुम्ही ते धूळ म्हणून घासून काढाल, परंतु ही पावडर कार्बाइड असू शकते, ज्यामुळे फळ लवकर पिकते. या कार्बाइड्सचा वापर आंबा आणि केळी शिजवण्यासाठी देखील केला जातो. त्यामुळे कलिंगड कापण्यापूर्वी ते पाण्याने चांगले धुवावे.
कलिंगड खूपच लाल वाटतंय का? : लक्षात घ्या, नैसर्गिक गोष्टी या जाहिरातीत दिसतात त्यापेक्षा खूप वेगळ्या असतात. अनेकदा इंजेक्ट केलेले कलिंगड खूप लाल दिसते. अगदी कापताना तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त लालसरपणा आणि गोडवा जाणवेल. तसेच, मध्यभागी पोहोचताना, तुम्हाला रसायनांमुळे थोडा जळलेला, काळपट लाल भाग दिसेल. दिसायला जरी अगदी छान, ताजं वाटणारं असं हे कलिंगड असलं तरी त्यात रसायने असू शकतात. हे तपासण्यासाठी आपण कलिंगडाच्या फोडीवर कापसाचा बोळा फिरवून पाहू शकता, जर बोळ्याला रंग लागला तर हे भेसळयुक्त फळ आहे हे ओळखा.
छिद्र किंवा भेगा तपासा: कलिंगडाला जर सुया टोचल्या असतील तर अनेक वेळा लहान छिद्र होते काही वेळा या छिद्रातून भेगा सुद्धा पडतात. अनेकदा व्यापारी सुद्धा फायदा पाहून वाहतुकीदरम्यान असं झालं असावं असं सांगतात. पण तुम्हाला या दोन्हींमधील फरक लगेच लक्षात येऊ शकतो. कलिंगडावर जाळीदार रेषा येणे हे नैसर्गिक आहे पण भेग पडणे, छिद्र असणे हे भेसळीचे लक्षण आहे. अगदी कलिंगड कापल्यावर आतपर्यंत तुम्हाला हे छिद्र दिसू शकते.
हे ही वाचा<< एका कलिंगडात दडलंय किती पोषण? डायबिटीस असो वा वजन कमी करण्याचं मिशन, किती व कसं खाल गोड कलिंगड
कलिंगड चांगले आहे का हा ओळखण्याचा थोडा वेळखाऊ पण अत्यंत प्रभावी मार्ग सांगायचा तर, तुम्ही बाजारातून आणल्यावर किमान दोन ते तीन दिवस हे कलिंगड कापू नका. नैसर्गिकरित्या पिकवलेले कलिंगड बराच काळ न कापता चांगले राहू शकते पण भेसळयुक्त कलिंगडातून लगेचच फेस निघू लागतो, किंवा ते नरम पडते, पाणी बाहेर येऊ लागते.