How To Know If Your Aloe Vera Gel Is Real Or Fake : त्वचा, केस या दोन्हींच्या सौंदर्यासाठी आपण सगळेच पहिले प्राधान्य कोरफडीला देतो. कारण- कोरफडीचे फायदे तर सर्वांनाच माहीत आहेत. या रोपामध्ये नैसर्गिक स्वरूपातील मॉइश्चरायझिंग गुणधर्म मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे हल्ली बाजारामध्येही कोरफड जेल उपलब्ध असते. पण, बाजारात उपलब्ध असलेल्या प्रत्येक अ‍ॅलोवेरा जेलवर विश्वास ठेवणे योग्य आहे की नाही याबद्दल तुम्हाला माहीत आहे का? बनावट आणि रसायनांवर आधारित जेल वापरल्याने तुमच्या त्वचेला फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते. आता प्रश्न असा आहे की, खरे आणि बनावट अ‍ॅलोवेरा जेल कसे ओळखायचे?

येथे पाच सोप्या टिप्स आहेत, ज्या तुम्हाला अ‍ॅलोवेरा जेल बनावट तर नाही ना हे ओळखण्यास मदत करू शकतात…

१. रंग आणि पोत तपासा – कोरफडयुक्त जेल थोडेसे पारदर्शक किंवा हलकेसे हिरवे असते. जर एखादे जेल खूप गडद हिरव्या किंवा पांढऱ्या रंगाचे दिसत असेल, तर ते बनावट असू शकते. तसेच, खऱ्या जेलचा पोत हलका आणि पाण्यासारखा असतो; तर याउलट बनावट जेल चिकट किंवा खूप जाड असू शकते.

२. साहित्याची यादी काळजीपूर्वक वाचा – जेव्हाही तुम्ही अ‍ॅलोवेरा जेल खरेदी करता, तेव्हा त्यातील घटकांची यादी वाचा. जर त्यात कोरफडीव्यतिरिक्त अनेक रसायने आणि संरक्षक (जसे की पॅराबेन्स आणि कृत्रिम सुगंध) जोडले गेले असतील, तर ते शुद्ध अ‍ॅलोवेरा जेल नाही. खऱ्या अ‍ॅलोवेरा जेलमध्ये कोरफडीचे प्रमाण ९०% पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

३. सुगंध ओळखा – खऱ्या कोरफडीच्या जेलचा सुगंध सौम्य आणि नैसर्गिक असतो. जर जेलला खूप तीव्र आणि कृत्रिम वास येत असेल, तर ते बनावट असू शकते. बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक बनावट जेलला तीव्र वास असतो, जो खऱ्या कोरफडीच्या जेलपेक्षा पूर्णपणे वेगळा असतो.

४. पॅकेजिंग आणि ब्रँड – नेहमी चांगल्या आणि विश्वासार्ह कंपनीचे अ‍ॅलोवेरा जेल खरेदी करा. स्थानिक ब्रँड किंवा अनोळखी कंपन्यांचे जेल टाळा. कारण- ते अशुद्ध असू शकते. तसेच पॅकेजिंगवर ‘१००% शुद्ध अ‍ॅलोवेरा’ किंवा ‘No Added Chemicals’ असे लिहिले असले तरी त्यातील घटक (ingredients) वाचून पाहा.

५. त्वचेवर पॅच टेस्ट करा – जर तुम्ही अ‍ॅलोवेरा जेल खरेदी केले असेल, तर ते वापरण्यापूर्वी स्किन टेस्ट करा. तुमच्या हातावर थोडे जेल लावा. जर तुम्हाला जळजळ, खाज किंवा चिकटपणा जाणवत असेल, तर त्याचा अर्थ असा होतो की ते शुद्ध नाही. खरे अ‍ॅलोवेरा जेल लावल्याने थोडा थंडावा मिळतो आणि ते त्वचेत लवकर शोषले जाते.

तुमच्या त्वचेला कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून खरे आणि बनावट अ‍ॅलोवेरा जेल ओळखणे खूप महत्त्वाचे आहे. नेहमी चांगल्या दर्जाचे जेल खरेदी करा आणि वरील टिप्स लक्षात ठेवा. शक्य असल्यास घरी ताज्या कोरफडीचे जेल काढा आणि ते वापरा; जेणेकरून तुम्हाला शुद्ध आणि रसायनमुक्त जेल मिळेल.