बाहेरून आणलेले पदार्थ, सामान आपण जास्त दिवस घरामध्ये, फ्रिजमध्ये टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो. परंतु, काही पदार्थ असे असतात जे कितीही काही केले तरी काही दिवसांतच खराब होण्यास सुरू होतात. परंतु, इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @cookistwow नावाच्या एका अकाउंटने नाशवंत पदार्थ लवकर खराब न होऊ देता, जास्त दिवस कसे टिकवून ठेवायचे यासाठी काही सोप्या व उपयुक्त टिप्स दिल्या आहेत, त्या पाहा.
१. चीज
तुम्ही जर वापरलेले चीज नुसतेच फ्रिजमध्ये ठेवत असाल किंवा प्लास्टिकमध्ये गुंडाळून ठेवत असाल, तर ते लवकर पिवळे पडण्याची, खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे चीज बटर पेपरमध्ये गुंडाळून ठेवावे. प्लास्टिकच्या पिशवीत ठेवल्याने चीज दबून राहिल्यासारखे होते आणि म्हणून ते पटकन वाया जाऊ शकते.
२. केळी
अनेकदा इतर फळांप्रमाणे केळीसुद्धा बरीच मंडळी फ्रिजमध्ये ठेवतात; परंतु असे केल्याने केळी पटापट खराब होतात. असे होऊ नये यासाठी केळी फ्रिजमध्ये न ठेवता, बाहेरच ठेवावीत. शक्य असल्यास केळ्यांच्या देठांना प्लास्टिक गुंडाळून ठेवा. त्यामुळे केळी अधिक काळ टिकण्यास मदत होऊ शकते.
हेही वाचा : स्वयंपाकघरात एकही झुरळ दिसणार नाही; घरातील उदबत्त्या अन् कापूर करतील तुमची मदत! पाहा ही सोपी हॅक….
३. गाजर
गाजर फ्रिजमध्ये राहिल्याने लवकर वाळून जाते. असे न होण्यासाठी गाजर सोलून आणि देठाचा भाग काढून टाकून, पाण्याने भरलेल्या काचेच्या बरणीत घालून; झाकण घट्ट बंद करून फ्रिजमध्ये ठेवावे. त्यामुळे गाजरे सात दिवसांसाठी अगदी ताजी राहू शकतात.
४. हर्ब्स
रोजमेरी, पार्स्ली, कोथिंबीर यांसारखे हर्ब्स शक्यतो एका दिवसातच खराब होण्यास सुरुवात होते. त्यामुळे त्यांना जास्त दिवस टिकवून ठेवण्यासाठी, हर्ब्स बारीक चिरून घेऊन आइस ट्रेमध्ये घालावे. त्यानंतर त्यामध्ये ऑलिव्ह तेल घालून फ्रिजरमध्ये घट्ट करण्यास ठेवून द्यावे. या ट्रिकमुळे तुमचे हर्ब्स जास्त वेळेसाठी चांगले राहू शकतात.
५. सॅलड/ लेट्युस
सॅलड किंवा लेट्युसची पाने वेगळी करून, त्यांना काचेच्या हवाबंद डब्यात भरून, त्यावर एक टिश्यू पेपर ठेवून झाकण लावून घ्या. डब्यातील अतिरिक्त ओलावा टिश्यू पेपर शोषून घेऊन लेट्युस/सॅलडची पाने जास्त वेळेसाठी ताजी राहण्यास मदत होते.
यासोबतच जे पदार्थ लवकर खराब होत नाहीत, त्यांना कसे साठवून ठेवावे?
गुरुग्राम येथील मणिपाल हॉस्पिटलमधील कार्यकारी आहारतज्ज्ञ, डीटी शालिनी गार्विन ब्लिस यांनी लवकर खराब न होणारे पदार्थ, जसे की डाळी, धान्य यांसारखे पदार्थ व्यवस्थित टिकवून ठेवण्यासाठी काही उपयुक्त टिप्स द इंडियन एक्स्प्रेसला सांगितल्या आहेत.
डाळी किंवा धान्य यांसारखे पदार्थ व्यवस्थित स्वच्छ करून, त्यामधील कचरा, किडे किंवा इतर अनावश्यक घटक बाजूला काढून; शक्य असल्यास दिवसभर कडक उन्हामध्ये वाळवून मग डब्यात भरावेत.
डाळी, धान्य हे स्टील, काच, अॅल्युमिनियम, प्लास्टिक यांसारख्या घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा.
शक्य असल्यास धान्य किंवा पदार्थ साठवून ठेवण्याची जागा स्वयंपाकघरापासून थोडी लांब असावी. स्वयंपाकघरात गॅस चालू असतो. त्यामुळे तेथील हवेचे प्रमाण बदलत असते. अशा वेळेस सर्व सामान थोडे लांब साठवून ठेवलेले बरे असते.
@cookistwow या अकाउंटने शेअर केलेल्या या सोप्या किचन हॅक्सना आजपर्यंत सात लाख १७ हजार इतके व्ह्युज मिळाले आहेत.