Lose 5kg in 15 Days : वजन कमी करणे हे खूप मोठे आव्हान आहे. वजनवाढीच्या समस्येने ग्रासलेले अनेक लोक वजन कमी करण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करताना दिसतात. १५ दिवसांत पाच किलो वजन कमी करण्याचा तुम्ही कधी विचार केला का? हे कदाचित कठीण वाटू शकते; पण हे अशक्य नाही. त्यासाठी क्रॅश डाएट किंवा जिममध्ये जाण्याची गरज नाही, तर निरोगी जीवनशैली स्वीकारणे महत्त्वाचे आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, फक्त १५ दिवसांत पाच किलो वजन कसे कमी करू शकतो. तर, आज आपण त्याविषयीचत जाणून घेणार आहोत.
उपाशीपोटी सकाळी कोमट पाण्यात लिंबू आणि मध टाकून सेवन करा
लिंबू-मधाच्या कोमट पाण्याने आपल्या दिवसाची सुरुवात करणे गेम चेंजर ठरू शकते. लिंबूमध्ये क जीवनसत्त्व आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, जे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास आणि चयापचय वाढविण्यास मदत करतात. त्याशिवाय मधामध्ये आरोग्यास फायदेशीर गुणधर्म असतात, जे ऊर्जा प्रदान करतात. कोमट पाण्यात एक चमचा मध आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळून टाका आणि सकाळी उपाशीपोटी त्याचे सेवन करा.
पौष्टिक नाश्ता करा
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असा पौष्टिक नाश्ता करणे अत्यंत आवश्यक आहे. अंड्यामध्ये खूप जास्त प्रोटीन्स असतात, ज्यामुळे एकदा अंडे खाल्यानंतर पोट भरल्याची भावना राहते. दीर्घकाळ ऊर्जेसाठी ओट्स, धान्य, तसेच जीवनसत्त्व आणि खनिजांसाठी तुम्ही नाश्त्यात फळांचा समावेश करू शकता.
कमीत कमी एक तास व्यायाम करा
वजन कमी करण्यासाठी दररोज कमीत एक तास व्यायाम करणे आवश्यक आहे. व्यायामामध्ये कार्डिओ व्यायाम जसे की चालणे किंवा धावणे, तसेच स्नायूंच्या आरोग्यासाठी आणि चयापचय शक्ती वाढविण्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग आवश्यक आहे. व्यायामासाठी तुम्हाला जिममध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही डान्स, पोहणे किंवा इतर दैनंदिन कामे करून कॅलरीज कमी करू शकता.
सावकाश खा
सावकाश खाल्ल्याने कॅलरी कमी करण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होऊ शकते. मेंदूला आपले पोट भरल्याचे सिग्नल मिळण्यास जवळपास २० मिनिटे लागतात. जर तुम्ही खूप लवकर खाल्ले, तर तुमचे पोट भरले आहे हे मेंदूला समजण्यापूर्वीच तुमच्याकडून जास्त खाल्ले जाऊ शकते आणि त्यामुळे वजन वाढू शकते. जेवताना अन्न नीट चावून खा. तसेच जेवताना टीव्ही किंवा मोबाईल पाहणे टाळा.
साखरयुक्त पेये कमी करा
फळांचे रस आणि चहा-कॉफी यांसारख्या साखरयुक्त पेयांमुळे वजन वाढते. त्याऐवजी पाणी, हर्बल टी किंवा ब्लॅक कॉफी यांसारखे आरोग्यदायी पर्याय निवडा. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनच्या एका अभ्यासात सांगितल्याप्रमाणे, साखरयुक्त पेयांचे सेवन कमी केल्याने वजन कमी होते आणि लठ्ठपणाचे धोकेही कमी होतात.
चांगली झोप घ्या
चांगली झोप ही आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर बाब आहे. झोपेच्या कमतरतेमुळे भूक नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्सचे संतुलन बिघडू शकते, ज्यामुळे भूक वाढते आणि आपल्याला अति जास्त कॅलरीजयुक्त पदार्थ खावे, असे वाटते. वजन कमी करण्यासाठी दररोज रात्री कमीत कमी सात-आठ तास झोप घेणे आवश्यक आहे.
पाणी पिण्याचे फायदे
वजन कमी करण्यासाठी आणि एकूणच चांगल्या आरोग्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी भूक कमी करण्यास, चयापचय वाढविण्यास, तसेच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत करू शकते. दिवसातून कमीत कमी ८-१० ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करा. तसेच शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी आहारात काकडी, टरबुज व संत्री यांसारखे हायड्रेटिंग फळांचा समावेश करा.