Gudi Padwa 2025 Step-by-step process to create a traditional Gudi: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढी पाडवा. गुढी पाडव्याच्या दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात होते. हा दिवस हिंदू दिनदर्शिकेनुसार खूप शुभ मानला जातो. म्हणून या दिवशी नव्या कामाची सुरुवात करणे फलदायी असते असे मानले जाते. महाराष्ट्रामध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गुढी पाडव्यानिमित्त घरोघरी गुढ्या उभारलेल्या पाहायला मिळतात. शोभायात्रांसह नानाविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अन्य राज्यांमध्येही हा सण साजरा करण्याची परंपरा आहे. गुढी पाडव्याच्या दिवशी गुढीला फार महत्त्व असते. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या शुभ मुहूर्तावर लोक पहाटे लवकर उठून स्नान करतात. त्यानंतर गुढी तयार करुन पूजा केली जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार, गुढीपाडवा हा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मानला जातो. यंदा हा सण रविवारी, ३० मार्च रोजी साजरा होणार आहे. हा दिवस मराठी नववर्षाची सुरुवातही मानला जातो. मात्र गुढी उभारण्याची पारंपरिक पद्धत अनेक नववधू किंवा कुटुंबापासून दूर राहणाऱ्या मुलांना माहित नसते. त्यामुळे आज आपण त्याबद्दल सविस्तर माहिती पाहुयात.

गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त (Gudi Padwa Puja Muhurat)

हिंदी दिनदर्शिकेनुसार, गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त ३० मार्च रोजी सकाळी ४ वाजून ४१ मिनिटांपासून ते सकाळी ५ वाजून २७ मिनिटांपर्यंत आहे.

अभिजात मुहूर्त – दुपारी १२ वाजून १ मिनिटांपासून ते दुपारी १२ वाजून ५० मिनिटांपर्यंत असेल.

विजय मुहूर्त – दुपारी २ वाजून ३० मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून १९ मिनिटांपर्यंत असेल

गोधूलि मुहूर्त – संध्याकाळी ६ वाजून ३७ मिनिटांपासून ते ७ वाजेपर्यंत असेल.

गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी असल्याने या दिवशी जरी शुभ मुहूर्तावर पूजा करता आली नाही, तरी तुम्ही संपूर्ण दिवसात कधीही पूजा करू शकता.

गुढी कशी उभारावी? (how to make gudi on gudi padwa)

गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारण्याला विशेष महत्त्वं आहे. उंच बांबूच्या काठीवर ही गुढी उभारली जाते. सहसा ती घराच्या छतापासून वर असेल अशीच बांधली जाते. अर्थात शहरी भागात हे अनेकदा शक्य नसल्यामुळे गुढीच्या उंचीपेक्षा ती उभारण्याला अधिक प्राधान्य दिलं जातं. गुढी पूजनात नेमकं कोणतं साहित्य लागतं? जाणून घेऊया.

गुढी पूजनासाठी लागणारं साहित्य:

  • एक उंच काठी
  • साडी किंवा ब्लाऊज पिस
  • साखरेच्या गाठी
  • कडूलिंबाची पानं
  • फुलांचा हार
  • तांब्याचा गडवा
  • आंब्याची डहाळी
  • अष्टगंध
  • हळद-कुंकू
  • पाट

गुढी उभारण्यासाठी बांबूची काठी स्वच्छ धुवून घ्यावी. यानंतर काठीच्या वरच्या टोकाला एक स्वच्छ वस्र किंवा साडी गुंडाळली जाते. यावर मग, कडुलिंब, आंब्याची डहाळी, फुलांची आणि साखरेच्या गाठीची माळ बांधली जाते. या सर्व गोष्टी काठीला बांधून त्यांवर कलश तांब्या उपडा ठेवून तोसुद्धा घट्ट बसवावा.

सजवलेल्या काठीला अष्टगंध, हळद कुंकू वाहा. ज्यानंतर गुढी उभारण्यासाठीची जागा स्वच्छ करुन घ्या. खाली पाट ठेवा आणि त्याभोवती रांगोळी काढा. सर्व कुटुंबियांच्या उपस्थितीत पाटावर गुढी उभारा. तु्म्ही खिडकीला बांधून देखील गुढी उभारू शकता. आता गुढीसाठी आरतीचं ताट करुन ओवाळून घ्या.

गुढी उभारल्यानंतर

ब्रह्मध्वज नमस्तेरस्तु सर्वाभिष्ट फलप्रद।
प्राप्तेरस्मिन्वत्सरे नित्यं मदगृहे मंगल कुरु ।।

ही प्रार्थना म्हणावी. त्यानंतर पंचांगांचे पूजन करुन नववर्षाच्या पहिल्या दिवसाचे पंचांग वाचावे. पुढे कडुलिंब, गूळ, जिरे आदी घालून केलेले कडुलिंबाचे पाणी घ्यावे. यंदा चैत्र महिन्यातील प्रतिपदा तिथी २९ मार्च रोजी संध्याकाळी ४ वाजून २७ मिनिटांनी सुरू होणार असून ती ३० मार्च दुपारी १२ वाजून ४९ मिनिटांपर्यंत असेल. अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार ३० मार्च रोजी गुढीपाडवा हा सण साजरा केला जाईल.

सूर्य मावळायला लागल्यावर त्याला नमस्कार करुन न गुढी उतरवून ठेवावी.