DIY natural colors for holi 2024 : वर्षातील सर्वांत रंगीत सण काही दिवसांवर आलेला आहे. हा सण म्हणजे होळी. सकाळपासून दुपारपर्यंत मित्रांना रंगीत पाण्याने अंघोळ घालणे, कोरड्या रंगानी एकमेकांचे संपूर्ण चेहरा, हात, मान, केस इ. भरून टाकणे, पिचकाऱ्यांनी खेळणे असा धांगडधिंगा या दिवशी घातला जातो. लाल, हिरवा, गुलाबी, पिवळा, निळा अशा विविध रंगांनी होळी हा सण साजरा होतो.
मात्र, अनेकदा विकत घेतलेल्या या रंगांनी आपली त्वचा, केस यांना खूप त्रास होऊ शकतो. केस, त्वचा कोरडी पडणे, रंग डोळ्यांत गेल्यास डोळे चुरचुरणे, रंगांची अॅलर्जी होणे अशा समस्या होळीनंतर अनेकांना उदभवू शकतात. असे होऊ नये यासाठी आपण अनेकदा आपल्याला ‘होळी खेळताना नैसर्गिक रंगांचा वापर करायला हवा’, असे सल्ले ऐकायला मिळतात. मात्र, नैसर्गिक रंग नेमके बनवायचे कसे ते कुणी सांगत नाही. त्यामुळे आज आपण होळी खेळण्यासाठी घरात सहज उपलब्ध असलेल्या गोष्टींपासून रंग कसे तयार करायचे ते पाहणार आहोत.
हेही वाचा : Car tips : ‘बुरा ना मानो होली है!’ पण गाडीवर रंग उडाला तर? होळीआधी पाहा ‘या’ टिप्स
होळीसाठी नैसर्गिक रंग कसे बनवावेत?
१. लाल रंग
लाल रंग तयार करण्यासाठी आपण सुंदर जास्वंदाच्या फुलांचा वापर करू शकतो. त्यासाठी जास्वंदाची फुले अगदी चुरचुरीत होईपर्यंत वाळवून घ्या. आता वाळलेली फुले मिक्सरमध्ये वाटून, एकदम बारीक पावडर तयार करा. या पावडरीचा लालसरपण वाढविण्यासाठी त्यामध्ये डाळीचे पीठ किंवा केशर यांचा वापर करू शकता.
२. पिवळा रंग
पिवळा रंग तयार करण्यासाठी आपण हळदीचा वापर करू शकतो. हळद आणि डाळीचे पीठ हे १:२ या प्रमाणामध्ये एकत्र करा. आता हे दोन्ही पदार्थ व्यवस्थित एकजीव होण्यासाठी ते चाळणीच्या मदतीने किमान दोन-तीन वेळा चाळून घ्या.
३. किरमिजी किंवा मजेंटा रंग
तुम्हाला जर नैसर्गिक पद्धतीने थोडासा पक्का रंग हवा असेल, तर त्यासाठी तुम्ही बीटाचा वापर करू शकता. विकत मिळणारा पक्का रंग हा त्वचेवर बरेच दिवस तसाच राहतो. तसेच अशा रंगामुळे एखाद्या व्यक्तीला त्रासदेखील होऊ शकतो. मात्र, बीटाचा वापर करून बनविलेला हा ओला रंग असून, पक्क्या रंगाचे काम करू शकतो.
४. हिरवा रंग
नैसर्गिक पद्धतीने कोरडा हिरवा रंग बनविण्यासाठी तुम्ही हेना [मेंदी] आणि तांदळाच्या पिठाचा वापर करू शकता. जर तुम्हाला ओला रंग बनवायचा असेल, तर हेना पाण्यामध्ये कालवून घ्या. हा रंगसुद्धा पक्क्या रंगाप्रमाणे काम करू शकतो.
५. चॉकलेटी रंग
कॉफी पावडर पाण्यामध्ये मिसळून आपण घरच्या घरी सुंदर वासाचा चॉकलेटी रंग बनवू शकतो. मात्र, कॉफीपासून बनविलेल्या रंगापासून कपड्यांवर डाग पडू शकतात.
अशा पद्धतीने घरात अतिशय सहज उपलब्ध असणाऱ्या वस्तूंपासून काही मिनिटांमध्ये खूप सुंदर आणि नैसर्गिक रंग बनवू शकतो, अशी माहिती हिंदुस्थान टाइम्सच्या एका लेखावरून मिळते.