अँड्रॉईड मोबाईलमधल्या न लागणाऱ्या गोष्टी अनेकदा डिलीट करतो. मात्र, काही वेळाने या गोष्टी आपल्याला हव्या असतात. आता मोबाईलमधून डिलीट केलेला डेटा पुन्हा कसा मिळणार हा प्रश्न आपल्यासमोर साहजिकच येतो. कॉम्प्युटरमधील एखादी गोष्ट आपण डिलीट केली आणि नंतर ती हवी असल्यास रिसायकल बिनचा पर्याय आपल्याकडे उपलब्ध असतो. पण मोबाईलमध्येही कॉम्प्युटरप्रमाणे रिसायकल बिन तयार करता येतो याची आपल्याला साधी कल्पनाही नसते. मात्र, या सुविधेमुळे कधीकाळी आपण डिलीट केलेला डेटा आपल्याला पुन्हा मिळवू शकतो.
आता यासाठी नेमके काय करायचे? तर मोबाईलमध्ये डम्पस्टर आणि ईएस फाईल एक्सप्लोरर या दोन्हीपैकी एक कोणतेही एक अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. यापैकी डम्पस्टर अॅप डाऊनलोड केले तर ते सर्वात पहिल्यांदा आपले स्वागत करते. त्यानंतर आपल्याला डेमोसाठी विचारणा करण्यात येईल. त्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये रिसायकल बिन तयार होईल. आता ते उघडल्यावर त्यामध्ये तुम्हाला काहीच दिसणार नाही. कारण तुम्ही नव्याने कोणती गोष्ट डिलीट केलेली नसेल. मात्र, तुम्ही गॅलरीमधून एखादा फोटो किंवा व्हिडिओ डिलीट करुन पाहिल्यास तो फोटो तुम्हाला या अॅप्लिकेशनमध्ये नक्की दिसेल.
यामध्ये आणखी एक विशेष बाब म्हणजे आपल्याला हवे असल्यास आपण या गोष्टी रिस्टोअर किंवा डिलीट करु शकतो. या अॅप्लिकेशनमध्ये आपण वेळही सेट करु शकतो. यामुळे जास्त दिवस झाल्यानंतर यातील जुन्या फाईल्स आपोआप डिलीट होऊन जातील. परंतु, टायमर न लावल्यास रिसायकल बिनसारख्या या अॅपमध्ये तुमचे फोटो सेव्ह झाले तर मेमरी फुल होऊन जाईल. रिसायकल बिनप्रमाणे असणारे हे अॅप्लिकेशन आपल्यातील अनेकांना खऱ्या अर्थाने उपयोगी ठरणारे आहे.