एखाद्या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज करताना रेझ्युमे महत्त्वाचा असतो. कारण यात नाव, पत्ता, शिक्षण याचा लेखाजोखा असल्याने निवडकर्त्यांना तुमच्याबद्दल योग्य माहिती मिळते. जर लिखित रेझ्युमेसोबत व्हिडीओ रेझ्युमेचा समावेश केल्यास छाप पडते. तुमच्या अर्जासोबत व्हिडीओ रेझ्युमे जोडणे अनिवार्य नसले तरी टेलिव्हिजन रिपोर्टर, न्यूज अँकर, जनसंपर्क अधिकारी, रेडिओ जॉकी, अभिनेते, शिक्षक, सॉफ्ट स्किल ट्रेनर, फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्ह अशा काही विशिष्ट भूमिकांसाठी व्हिडीओ रेझ्युमे जोडणे फायदेशीर आहे. कारण व्हिडीओ रेझ्युमेमुळे निवडकर्त्यांना अर्जदाराच्या सादरीकरण कौशल्याची अतिरिक्त माहिती मिळते. तसेच निवड करण्यास मदत करते. व्हिडीओ रेझ्युमे शॉर्ट्स असावा आणि निवडकर्त्यांच्या आवश्यकतांशी जुळणारा असावा. व्हिडीओतून अनुभवांबद्दल निवडकर्त्याला सांगण्याचा उद्देश असावा.
प्रत्येक नोकरीसाठी विशिष्ट व्हिडीओ रेझ्युमे बनवला पाहिजे. यासाठी सर्वप्रथम स्क्रिप्ट तयार केली पाहिजे. कंपनीच्या आवश्यकतेनुसार स्क्रिप्टची रचना असायला हवी. उदाहरणार्थ, समजा एक कंपनी डिझायनर शोधत असेल, तर डिझाइन आणि अनुभवावर आधारित व्हिडिओ असावा. व्हिडिओ रेझ्युमेची स्क्रिप्ट तयार करण्यापूर्वी अर्जदाराने जाहिरात केलेल्या नोकरीच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत. दुसरीकडे, समजा कंपनी डिजिटल मीडिया मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह शोधत असेल, तर अर्जदाराने प्रथम स्वत: मूल्यमापन केले पाहिजे की ती/तो या भूमिकेसाठी योग्य आहे की नाही. कारण अनेकदा असे दिसून आले आहे की, अर्जदार योग्य नसलेल्या नोकरीसाठी अर्ज करतात. अगदी नवीन अर्जदारांनीही विशिष्ट नोकरीच्या आवश्यकतांशी संबंधित काही कौशल्ये शिकलेली असावीत.
व्हिडिओ रेझ्युमे बनवताना या बाबी लक्षात ठेवा
- तुम्ही तुमची स्क्रिप्ट पूर्ण केल्यावर व्यावसायिक व्हिडीओ निर्मितीसाठी स्वत:ला तयार करा.
- एक व्यावसायिक म्हणून स्वत:ची टापटीप वेषभूषा असली पाहिजे.
- रेकॉर्डिंगला जाण्यापूर्वी आरशासमोर अनेक वेळा सराव करा.
- व्हिडीओ तयार करण्यासाठी व्यावसायिक कॅमेरामनची मदत घ्या. ऑडिओसाठी कॉलर माइक वापरा. बॅकग्राउंडसह योग्य प्रकाश असावा.
- व्हिडीओ रेकॉर्ड करताना बोलताना आत्मविश्वास असला पाहीजे. कॅमेऱ्याच्या लेन्सकडे पाहून व्हिडिओ रेकॉर्डिंग करा.
- व्हिडीओ रेकॉर्ड झाल्यानंतर आपल्या वाक्यांची पुनरावृत्ती झाली नाही ना याची तपासणी करा.
- जर व्हिडीओ हिरव्या किंवा निळ्या पडद्यावर शूट केला असेल, तर व्यावसायिक स्वरूप असलेली आभासी पार्श्वभूमी वापरा.
- व्हिडीओ खूप मोठा नसावा यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे. व्हिडीओ ९० सेंकदापेक्षा मोठा नसावा.
- व्हिडीओ तयार झाल्यानंतर कंपनीला पाठवण्यापूर्वी इतरांना दाखवा आणि त्यांचा फिडबॅक घ्या.
- व्हिडीओ रेझुम्येसोबत लिखित रेझुम्ये पाठवायला विसरू नका. कारण व्हिडीओ रेझ्युमे हा फक्त छाप पाडण्याच्या हेतूने पाठवायचा आहे.
- लिखित रेझ्युमेमध्ये नसलेल्या कोणत्याही बाबी व्हिडीओ रेझ्युमेमध्ये समाविष्ट करू नका.
- व्हिडीओ रेझुम्येमुळे तुम्हाला मुलाखतीसाठी बोलण्याची संधी वाढते.