दररोज आहारामध्ये बदाम खाल्ल्याने त्याचे कितीतरी फायदे शरीराला होत असतात. लहानपणी बुद्धी वाढावी, आपण हुशार व्हावे यासाठी आपले आई-वडील रात्री चार-पाच बदाम पाण्यात भिजवून ठेऊन ते सकाळी खायला द्यायचे. मात्र, बदामाचा उपयोग केवळ बुद्धी तल्लख करण्यासाठी नाही तर आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी, शरीरासाठी, केस, त्वचा या सर्वांसाठी होत असतो. केवळ काही बदाम तुम्हाला दिवसभर काम करण्याची ऊर्जा देऊ शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या आहाराची पोषकता वाढवण्यासाठी बदामाचा पाच वेगवेगळ्या पद्धतीने कसा वापर करू शकतो, याबद्दल मॅक्स हेल्थकेअरमधील विभागीय प्रमुख आहारतज्ज्ञ रितिका समद्दर यांनी माहिती दिल्याचे, न्यूज १८ डॉट कॉमच्या एका लेखातून समजते. काय आहेत या सोप्या टिप्स पाहा

हेही वाचा : खाली खोल दरी अन् दोरीच्या मदतीने गड चढतोय चिमुकला! पाहा, अंगावर काटा आणणारा धाडसी Video

आहारात बदामाचा समावेश कसा करावा?

१. कच्चे बदाम
कोणतीही प्रक्रिया न केलेले कच्चे बदाम खाणे सोपे असून, एक चांगला पर्याय आहे. कच्च्या बदामांमध्ये फायबर, प्रथिने आणि शरीरोपयोगी फॅट्स असतात. तसेच, बदामांमध्ये प्रथिनांचे प्रमाण भरपूर असते, ज्याचा फायदा शरीरातील मसल मास राखण्यास होतो. अगदी एखादे बारीकसारीक इन्फेक्शन किंवा जीवजंतूंचा त्रास झाल्यास त्यापासूनदेखील रक्षण करण्यास हे बदाम मदत करू शकतात.

२. बदामयुक्त बटर

तुम्ही जर सकाळी नाश्त्यासाठी ब्रेड बटर खात असाल तर तेव्हा साधे बटर खाण्याऐवजी, ब्रेडला बदामयुक्त बटर लावून खावे. यामुळे पदार्थाची चव वाढण्यात मदत होईल; त्यासह सकाळचा नाश्ताही पोटभरीचा आणि पौष्टिक होण्यास मदत होईल.

३. योगर्ट पेरफिट

पाणी काढलेले दही, त्यात तुमच्या आवडीची फळे आणि बदाम किंवा सुकामेवा घालून बनवला जाणारा हा पदार्थ आहे. मधल्या वेळेत खाण्यासाठी अतिशय स्वादिष्ट आणि पोषक घटकांनी भरलेला असतो. दही, फळे आणि बदाम यांमुळे शरीरास अँटिऑक्सिडंट्स, प्रोबायोटिक घटक आणि प्रथिने मिळण्यास उपयोग होतो. बदामांमध्ये फोलेट [folate] नावाचाही एक घटक असतो, ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढून सामान्य आजारांशी सामना करण्यासाठी शरीराला मदत होते.

हेही वाचा : Hair care : अरे बापरे! लहान वयातच केस पांढरे? पाहा ‘या’ घरगुती गोष्टी करतील तुमची मदत

४. मधल्या वेळेत बदाम खाणे

आपल्याला अचानक कधीतरी काही गोड खावेसे वाटते, अशा वेळेस त्या मोहाला बळी न पडता थोडे बदाम खाऊन गोड खायची इच्छा भागवावी. असे केल्याने तुम्ही विनाकारण साखर असणारे पदार्थ खाणार नाहीत, तसेच दिवसभर काम करण्याचा उत्साह आणि ऊर्जा मिळण्यास मदत होते. नुसते बदाम खण्याऐवजी बदाम, खजूर, खोबरे आणि मध हे सर्व पदार्थ एकत्र करून लाडू किंवा चिक्कीसारखा पदार्थ बनवून सोबत ठेवावे.

५. भाज्यांमध्ये वापर करणे

डायट करणाऱ्या व्यक्तींना, जर भाज्यांना अधिक पौष्टिक बनवायचे असल्यास काय करावे पाहा. भाज्यांना परतताना त्यामध्ये अख्खे बदाम किंवा बदामाचे तुकडे घालून काही मिनिटांसाठी परतून घ्यावे. असे केल्याने संपूर्ण पदार्थाचा स्वाद वाढतो, तसेच पोषक घटकांमध्ये वाढ होते.

त्यामुळे केवळ सुकामेवा खायचा म्हणून खाऊ नका. त्याऐवजी विविध पद्धतीने पौष्टिक पदार्थांचे सेवन कसे केले जाऊ शकते, याचा विचार करून आहार मजेशीर बनवावा. अशी माहिती न्यूज १८ डॉट कॉमच्या एका लेखावरून समजते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make your food super healthy and tasty with almonds with these five useful tips dha
Show comments