Home Remedy For Cold And Cough : हवामान बदलले की संसर्गाच्या अनेक समस्याही वाढायला सुरुवात होते. यामध्ये सर्वात आधी लक्षण दिसतं ते म्हणजे सर्दी-खोकला. हा श्वसनसंस्थेच्या संसर्गामुळे होणारा आजार आहे. हा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये वेगाने पसरतो. या संसर्गामध्ये ज्या व्यक्ती खोकतात तसेच शिंकतात, त्यातून हा संसर्ग लगेच पसरतो. अशाप्रकारे सर्दी झाली की आपण लगेच डॉक्टरांकडे जातो किंवा गोळ्या औषधं घेतो. मात्र, अशावेळी डॉक्टरकडे जाऊन औषधे घेण्यापेक्षा घरच्या घरी काही उपायांनी हा सर्दी-खोकला बरा करता येतो. औषधं घेऊन आपली प्रतिकारशक्ती कमी करण्यापेक्षा घरगुती उपाय करणे केव्हाही फायद्याचेच. असे बरेच नैसर्गिक उपाय आहेत, जे सर्दीपासून आराम मिळण्यासाठी मदत करतात. आरोग्यतज्ज्ञ डिंपल जांगडा यांनी औषधांचं सेवन न करता सर्दी कशी घालवायची याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

तुम्हाला सर्दी असेल तेव्हा ती कमी करण्यासाठी औषधे घेऊ नका, त्याऐवजी सर्दी बाहेर येऊद्यात; कारण सर्दी ही दोन प्रकारांमुळे होते. ॲलर्जी, प्रदूषक किंवा विषाणूंचा संपर्क. दुसरे म्हणजे, तणाव आणि थकवा. जेव्हा तुमचे शरीर थकते, तेव्हा तुमच्या शरीरात बदल होतात आणि तुम्हाला सर्दी होते.

सर्दीवर उपचार करण्यासाठी हे पाच नैसर्गिक मार्ग आहेत :

१. निलगिरी तेल किंवा पुदिन्याच्या पानांचे काही थेंब टाकून वाफ घ्या. त्यामुळे नाक मोकळे होण्यास मदत होते, यामुळे सर्दी आणि अस्वस्थतेपासून लक्षणीय आराम मिळू शकतो.

२. जेव्हा तुम्हाला सर्दी होते तेव्हा तुमच्या शरीराचे ऐकणे आणि जास्त क्रियाकलाप टाळणे आवश्यक आहे. कठोर व्यायाम किंवा घाम येणे यामुळे आणखी सर्दी होऊ शकते.

३. घशाच्या आरामासाठी कोमट पाण्यात गुळण्या करा. हळद आणि मीठ घालून गुळण्या केल्याने घसा खवखवणे आणि जळजळ कमी होण्यास मदत होते. हा सोपा उपाय सर्दीची लक्षणे व्यवस्थापित करण्यासाठी खूप प्रभावी ठरू शकतो.

४. मधाची पॉवर औषधी गुणधर्मांसह एक नैसर्गिक उपाय आहे. किसलेले आले, मिरपूड, हळद आणि दालचिनीसोबत मध सेवन केल्याने सर्दीची लक्षणे दूर होतात आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मध कच्चे सेवन करणे आणि गरम पाणी, चहा किंवा कॉफीमध्ये मिसळून टाकणे महत्त्वाचे आहे. मध खोकला कमी करण्यास आणि संसर्गापासून लढण्यासाठी आपल्या शरीराला ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत प्रदान करण्यास मदत करते.

५. सर्दीदरम्यान भरपूर कोमट पाणी पिणे आवश्यक आहे. कोमट पाणी, विशेषतः आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. दिवसभर कोमट पाणी पिण्याने तुम्ही हायड्रेटेड राहता.

हे नैसर्गिक उपाय सर्दीची लक्षणे व्यवस्थापित करण्यासाठी प्रभावी ठरू शकतात. तथापि, तुमची लक्षणे कायम राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

हेही वाचा >> हृदयविकाराचा झटका ओळखून स्मार्ट वॉच तुमचा जीव वाचवू शकतो का? वाचा संशोधनातून समोर आलेली माहिती…

सर्दी कमी करण्यासाठी नेहमी औषधांची आवश्यकता नसते. डिंपल जांगडा यांनी सांगितलेल्या नैसर्गिक उपायांप्रमाणेच, लक्षणे दूर करण्यात प्रभावीपणे मदत करू शकतात आणि आपल्या शरीराला बरे होण्याच्या प्रक्रियेत मदत करू शकतात.