Tips And Tricks For Stress Free Travel : ट्रेन, बस किंवा विमानातून प्रवास करताना अनेकदा वातावरण बदलांमुळे किंवा काही तांत्रिक बिघाडामुळे अडचण निर्माण होतात. याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागतोय. पण अशा परिस्थितीत कोणालाही राग, निराशा, चिंता येणे हे स्वाभाविक आहे, विशेषत: तुमच्याबरोबर वयोवृद्ध आणि लहान मूल प्रवास करत असेल तर अधिक काळजी वाटू लागते. यावेळी राग, निराशा, चिंता अशा मानवी भावना तीव्रपणे उफाळून येतात. दरम्यान तुम्हालाही प्रवासादरम्यान अशाप्रकारे काही अडचणी आल्यास घाबरू नका, यावेळी राग नियंत्रणात ठेवत शांततेत परिस्थिती हाताळण्यासाठी तुम्ही डॉक्टरांनी दिलेल्या काही टिप्स फॉलो करु शकता.
मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचे सल्लागार डॉ. शौनक अजिंक्य यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना विमान प्रवास चिंतामुक्त आणि आरामदायी होण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत. त्या टिप्स आपण जाणून घेऊ…
चिंतामुक्त प्रवासासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स
१) नेहमी ‘बी’ प्लॅन तयार ठेवा
प्रवास करण्यापूर्वी नेहमी एक बी प्लॅन तयार ठेवा. यात पर्यायी मार्ग, जवळील राहण्याची व्यवस्था आणि इतर वाहतुकीचे पर्याय जाणून घ्या. अशाप्रकारे तुम्ही प्रवासाला निघताना जर काही अडचणी आल्या, तर हा बी प्लॅन कामी येऊ शकतो; ज्यामुळे तुम्ही चिंतामुक्त राहू शकता. यावेळी तुमची नेहमीची औषधे बरोबर ठेवा.
२) प्रत्येक अपडेट्सची माहिती घ्या
ट्रेन, बस किंवा विमान प्रवासासंबंधीत अॅप्स आणि अधिकृत घोषणा तपासून तुमच्या वाहतूक व्यवस्थेची स्थितीबद्दलची अपडेट ठेवा. तुम्ही तुमच्या मोबाइलचा वापर पर्यायी ट्रेन, बस किंवा विमान सुविधेच्या माहितीसाठी, जवळपासच्या हॉटेल्सच्या माहितीसाठी आणि सोशल मीडियाद्वारे कस्टमर केअरशी संपर्क साधण्यासाठी करू शकता. कारण अनेक एअरलाइन्स कंपन्या असो वा रेल्वे प्रशासन आता सोशल मीडिया बझवर लवकर प्रतिक्रिया देतात.
३) हिवाळ्यात विमान प्रवासादरम्यान काळजी घ्या
हिवाळ्यात जगभरात सर्वत्र विमान,ट्रेन किंवा बस वाहतूक विलंबाने सुरू असते. अनेकदा विमान उड्डाण रद्द करण्याचीही परिस्थिती ओढवते. तर धुक्यामुळे ट्रेन, बस सेवाही उशीराने सुरु असते. अशावेळी अनेकदा प्रवासी संबंधीत वाहतुक व्यवस्थेतील कर्मचार्यांवर संताप व्यक्त करतात, पण काहीवेळाकर्मचाऱ्यांकडेही काही तात्काळ उपाय नसतात. पण परिस्थिती समजून घेत संबंधीत कर्मचार्यांशी व्यवस्थितरित्या बोलून नुकसान भरपाई मिळवण्यासाठी तुमची मानसिक स्थिती चांगली असणे आवश्यक आहे.
४) हायड्रेटेड आणि पोषणयुक्त राहा
डिहायड्रेशन आणि भूकेमुळे चिंता आणि तणाव वाढवतो. यामुळे प्रवासादरम्यान स्वत:ला हायड्रेटेड ठेवण्याचा प्रयत्न करा, यासाठी बरोबर पाण्याची बाटली आणि काही स्नॅक्स बरोबर ठेवा. कॅफीन, तंबाखू किंवा अल्कोहोलचा वापर टाळा, कारण याच्या सेवनामुळे चिडचिडेपणा वाढतो.
५) विश्रांती घ्या किंवा दुसऱ्या गोष्टींमध्ये लक्ष केंद्रित करा
विमान, ट्रेन किंवा बसने प्रवास करताना अनपेक्षित आव्हानांना सामोरे जावे लागू शकते, अशी परिस्थिती ओढवल्यास थोडा वेळ दीर्घ श्वास घ्या. यामुळे मज्जातंतूंना शांत करण्यास मदत होते आणि आपल्याला स्पष्टपणे विचार करण्यास प्रोत्साहन मिळते. तुमच्या मनात सुरू असलेल्या विचारांची घालमेल थांबवण्यासाठी, माइंडफुलनेस व्यायामाचा सराव करण्यासाठी किंवा विश्रांती घेण्यासाठी गर्दीपासून दूर एक शांत जागा शोधा.
तुम्ही पुस्तक वाचणे, मोबाइलवर गेम खेळणे, सायलेंट म्युझिक ऐकणे किंवा चित्रपट पाहणे यांसारख्या अॅक्टिव्हिटींसह चालू असलेल्या गोंधळापासून स्वतःचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्नदेखील करू शकता. तुम्हाला आवडत असलेल्या एखाद्या गोष्टीत गुंतल्याने तुमचे लक्ष निराशाजनक परिस्थितीपासून दूर होण्यास मदत होते.
६) सहप्रवाश्यांच्या संपर्कात राहा
या परिस्थितीत तुम्ही एकटे नाही आहात, इतर प्रवासीदेखील तितकेच त्रासले आहेत हे समजून घ्या. त्यामुळे सहप्रवाश्यांच्या संपर्कात राहा, त्यांच्याशी बोला, ते या परिस्थितीला कसे सामोरे जात आहेत ते पाहा. तुम्ही एकमेकांना अनुभव शेअर करा, बर्याचदा तुम्हाला यातून काही अमूल्य माहिती मिळू शकेल, जी परिस्थिती हाताळण्यास फायदेशीर ठरू शकेल.
कोणतीही परिस्थिती शांत आणि संयमाने हाताळल्यास त्याचा तुमच्या मानसिक आरोग्याला फायदा होता. तसेच कठीण परिस्थितीतून मार्गही काढता येतो, ज्याचे समाधानही वाटते.