Easy hacks to remove kitchen grease: स्वयंपाकघराला प्रत्येक घरातील आत्मा म्हटलं जातं. या ठिकाणी दररोज अनेक पदार्थ बनवले जातात. स्वयंपाकघरात दररोज बनवल्या जाणाऱ्या विविध पदार्थांमुळे येथील भिंतीवर तेलाचे, मसाल्यांचे डाग पडतात; ज्यामुळे भिंत चिकट होते आणि घाणेरडी दिसू लागते. अनेक कामावर जाणाऱ्या महिलांना हे डाग साफ करायला दररोज वेळ मिळत नाही, ज्यामुळे हे डाग जास्त खराब दिसू लागतात. शिवाय अनेक उपाय करूनही भिंतींवरील हे डाग जायचं नाव घेत नाही. आज आम्ही तुम्हाला काही सोपे आणि घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरातील भिंती आणि कॅबिनेटमधून हे हट्टी डाग सहजपणे काढून टाकू शकता.
स्वयंपाकघरातील डाग काढण्यासाठी उपाय
बेकिंग सोडा आणि शॅम्पू
एका मोठ्या भांड्यात दोन चमचे बेकिंग सोडा आणि तितक्याच प्रमाणात कोणताही शॅम्पू मिसळा. आता भांड्यात कोमट पाणी घाला आणि ते चांगले मिसळा. तयार केलेल्या मिश्रणात स्पंज बुडवा आणि त्याद्वारे भिंती आणि कॅबिनेट हलक्या हाताने घासून घ्या. यानंतर ते स्वच्छ, ओल्या कापडाने पुसून वाळवा. असे दोन ते तीन वेळा केल्याने भिंतींवरील डाग साफ होण्यास सुरुवात होईल.
व्हिनेगर आणि पाण्याचे मिश्रण
व्हिनेगर हे एक नैसर्गिक क्लिनर आहे, जे चिकटपणा काढून टाकण्यास मदत करते. अशावेळी एका स्प्रे बाटलीमध्ये सफेद व्हिनेगर आणि पाणी समान प्रमाणात मिसळा. चिकट पृष्ठभागावर स्प्रे करा आणि १०-१५ मिनिटे तसेच राहू द्या. नंतर मऊ कापडाने किंवा स्क्रब पॅडने स्वच्छ पुसून टाका. जर ग्रीस खूप घट्ट असेल तर तुम्ही स्प्रे बाटलीमध्ये थोडा बेकिंग सोडादेखील घालू शकता. बेकिंग सोडा केवळ ग्रीस काढून टाकण्यास मदत करत नाही तर दुर्गंधीदेखील दूर करतो.
कॉर्नस्टार्च आणि पाण्याचे मिश्रण
जर तुमच्या स्वयंपाकघरातील भिंतींवर जुने डाग दिसत असतील तर कॉर्नस्टार्च वापरणे फायदेशीर ठरू शकते. यासाठी दोन चमचे कॉर्नस्टार्च थोडे पाण्यात मिसळा आणि घट्ट पेस्ट बनवा. ते डाग असलेल्या भागावर लावा आणि कोरडे होऊ द्या. यानंतर भिंतीला स्पंजने हलके घासून घ्या आणि नंतर ओल्या कापडाने पुसून टाका.
भांडी धुण्याचे लिक्विड आणि बेकिंग सोडा
एक चमचा बेकिंग सोडा, एक चमचा डिशवॉशिंग लिक्विड थोड्या कोमट पाण्यात मिसळा. हे मिश्रण स्पंज किंवा ब्रशच्या मदतीने भिंतींवर लावा, हलके घासून घ्या आणि नंतर स्वच्छ कापडाने पुसून टाका. ही पद्धत दोन ते तीन वेळा केल्याने स्वयंपाकघरातील गुळगुळीत भिंती आणि कॅबिनेट स्वच्छ होण्यास मदत होऊ शकते.