ज्यांना रात्रीची शांत झोप येत नाही त्यांनाच त्याचे महत्त्व कळू शकते, पण आपल्या झोपेचा अभ्यास केला तर त्यात काही सुधारणा घडवून आणता येतील. त्यासाठी तुमच्या बेडशीटखाली ठेवता येईल असे झोपेची सर्व माहिती देणारे उपकरण विकसित करण्यात आले आहे. त्यात झोपेत तुमचे हृदयाचे ठोके किती होते व श्वास, झोपेचा दर्जा, झोपेचे तास किती होते हे सगळे समजते. झोपेची ही माहिती तुम्हाला मोबाईल अ‍ॅपवरही मिळवता येते. सध्या झोपेची माहिती गोळा करण्याच्या पद्धती या फार आरामदायी नाहीत. त्यांचा वापर वैद्यकीय कारणांसाठी होतो, पण आता जे उपकरण तयार केले आहे ते घरी वापरता येण्यासारखे आहे, असे हेलसिंकी विद्यापीठाचे जोनास पालसामा यांनी सांगितले. पालसामा यांच्या संशोधनाने झोपेचे मोजमाप करण्याचे नवे साधन उपलब्ध झाले असून त्यात झोपेचा दर्जाही समजतो. यात लवचीक फिल्म सेन्सर बेडशीटखाली ठेवला जातो. त्यात झोपेच्या हालचाली, हृदयाची स्पंदने टिपली जातात. झोप, घोरणे, हृदयाचे विश्रांतीवेळचे ठोके हे सगळे यात समजते. हा सेन्सर थेट व्यक्तीच्या शरीराला न लावताही केवळ बेडशीटखाली असला तरी माहितीची नोंद होते. सध्या हे उपकरण बाजारात उपलब्ध आहे व त्यात माहिती बिनतारी पद्धतीने मोबाईलवर दिसते. त्यानंतर मोबाईल अ‍ॅप झोपेत सुधारणा करण्याविषयी काही सल्ले देते. पण त्यासाठी डॉक्टरांचा सल्लाच जास्त योग्य असतो. फक्त ती माहिती तुम्ही डॉक्टरांना नोंद करून दाखवू शकता.

Story img Loader