How To Prevent Drainage Problem : किचनमधील बेसिन आणि बाथरूमची दररोज स्वच्छता करणे फार गरजेचे आहे. पण, त्यासह ड्रेनेज लाईन स्वच्छ ठेवणेही तितकेच महत्त्वाचे असते. किचन बेसिन आणि बाथरूमचा वारंवार वापर होत असतो. त्यामुळे कितीही स्वच्छ केली तरी काही तासांनी पुन्हा ते खराब दिसू लागते. काही वेळा बेसिन आणि बाथरूमच्या ड्रेनेजमध्ये पाणी साचून राहते. यावेळी काहीतरी उपाय करून आपण त्या पाण्याचा व्यवस्थित निचरा करतो; पण ड्रेनेज लाईनमध्ये सतत कचरा, खरकटे अडकून राहिल्याने ही समस्या अधिकच कठीण होऊ जाते. मग अशा वेळी प्लंबरला बोलावण्याशिवाय पर्याय उरत नाही. जर तुमच्याही किचन बेसिन किंवा बाथरूममध्ये सतत पाणी साठून राहत असेल, तर तुम्ही खालील दिलेले काही सोपे उपाय जरूर करून बघा.

पाईपमध्ये अडकलेला कचरा कसा साफ करायचा?

बाथरूम किंवा बेसीनच्या पाईपमध्ये अनेकदा खूप जाम कचरा अडकून राहतो. अशा वेळी तुम्ही व्हिनेगरचा वापर करून, या समस्येपासून सुटका करून घेऊ शकता. त्यासाठी सर्वप्रथम ॲसिडिक लिक्विड तयार करा. सर्वप्रथम व्हाईट व्हिनेगर, लिंबाचा रस, बेकिंग सोडा व गरम पाणी घ्या. आता सर्व गोष्टी व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर १० मिनिटांनी हे तयार झालेले द्रावण पाईपमध्ये ओता आणि काही वेळ तसेच राहू द्या. त्यानंतर एक लिटर गरम पाणी पाईपमध्ये टाका. अशा प्रकारे ड्रेनेज लाइनमध्ये जमा झालेला कचरा बाहेर निघून जाईल. जर ही समस्येचा त्रास वारंवार होत असेल, तर आठवड्यातून दोनदा हा उपाय नक्की करून पाहा.

मीठ आणि पाणी वापरा

जर तुमच्याकडे व्हिनेगर किंवा बेकिंग सोडा नसेल, तर तुम्ही मीठही वापरू शकता. त्यासाठी पाणी उकळवा. आता उकळते पाणी थोडे थंड करा, जेणेकरून ते टाकल्यानंतर पाईपचे कोणतेही नुकसान होणार नाही. आता पाण्याने जाम झालेल्या बेसिनमध्ये अर्धा कप मीठ घाला आणि नंतर त्यावर लगेच हळूहळू गरम पाणी ओता. अशा प्रकारे तुम्ही बेसिन किंवा बाथरूमच्या पाईपमध्ये साचलेली घाण काढून टाकू शकता.