Home Remedies To Make Tulsi Plant Green: तुळशीचं हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. प्रत्येकाच्या घराच्या अंगणात किंवा गॅलरीत आपल्याला तुळशीचं रोप पाहायला मिळतं. तुळशीमुळे घरात सुख, समृद्धी आणि भरभराट येते असं मानलं जातं, त्याचमुळे रोज सकाळी अनेक जण आवर्जून तुळशीची पूजा करतात. तुळशीला औषधी गुणधर्मांमुळेदेखील मान दिला जातो. ज्या घरात तुळशीचे रोप असते त्या घरात माता लक्ष्मी वास करते असे मानले जाते. तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. याचे वर्णन प्राचीन भारतातील ग्रंथांमध्येही आढळते.
तुळशी रोप असणं जितकं महत्त्वाचं त्याहूनही त्याची काळजी घेतली जाणं महत्त्वाचं आहे. पण, बऱ्याचदा असं दिसून येतं की उन्हाळा सुरू होताच तुळशीची पानं सुकायला लागतात किंवा मग पिवळी पडून ती गळायला सुरुवात होते, त्यामुळे उन्हाळ्यात तुळशीच्या रोपाची जास्त काळजी घ्यावी लागते. अशावेळी रोपाची काळजी कशी घ्यावी असा प्रश्न पडतो. तुमच्याही बाल्कनीतील तुळशीच्या रोपाची पानं पिवळी पडून सुकत असतील तर तुम्ही खाली दिलेला एक उपाय करू शकता, ज्यामुळे तुळशीची पानं पिवळी पडून सुकणार नाहीत, उलट तुळस पुन्हा हिरवीगार दिसेल.
वाढत्या उष्णतेमुळे तुळशीचे रोप सुकत असेल किंवा त्याची पाने गळत असतील, झाड कमकुवत दिसत असेल किंवा मुळे खराब झाली असतील तर त्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तुळशीची अशी अवस्था बघून खूप चिंता वाटते. तुमच्या घरातील तुळशीचीसुद्धा अशीच अवस्था झाली असेल तर काळजी करण्याचे कारण नाही. घरच्या घरी तुम्ही सोपा उपाय करून तुळशीच्या पानांना पुन्हा ताजेतवाने आणि हिरवेगार करू शकता. याविषयी माहिती सांगणारा व्हिडीओ shiprarai2000 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. स्वयंपाकात, साफसफाईच्या कामांमध्ये वापरला जाणारा बेकिंग सोडा हा तुळशीच्या रोपाला कसा संजीवनी देणारा ठरतो हे व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे. हा बेकिंग सोडा तुळशीच्या रोपांसाठी नेमका कसा वापरायचा, जाणून घ्या…
यासाठी आपल्याला बेकिंग सोडा आणि पाणी लागणार आहे. सर्वात आधी तुळशीच्या रोपाच्या मातीमध्ये १ टीस्पून बेकिंग सोडा थोड्या प्रमाणात घेऊन पसरवून टाका आणि त्यानंतर लगेच तुळशीच्या रोपात एक ग्लास पाणी घाला, यामुळे तुळशीची वाढ चांगली होण्यासाठी मदत होईल. हा उपाय आठवड्यातून एकदाच करा. असे केल्याने तुळशीच्या रोपाला बराच फायदा होईल. यामुळे पाने अधिक हिरवी होतील, असे व्हिडीओत सांगण्यात आले आहे.