How to Store Paneer for Long Time : दुधापासून तयार केला जाणारा पनीर हा पदार्थ अनेकांना आवडतो. पनीरची भाजी, पनीर पकोडा, पनीर पराठा असे अनेक चमचमीत पदार्थ आपण आवडीने खातो. आरोग्याच्या दृष्टीने पनीर हा अत्यंत पौष्टिक पदार्थ आहे. पनीरमध्ये प्रोटिन्स, कॅल्शियमसारखे पोषक गुणधर्म आहेत.
आपल्याला बहुधा ताजे पनीर खायला आवडते; पण पनीर दुधापासून तयार होत असल्यामुळे लवकर खराब होते. काही खास टिप्सच्या मदतीने तुम्ही पनीर एक-दोन दिवस नाही, तर महिनाभर ताजे ठेवू शकता. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.
१. फ्रिजमध्ये पनीर ठेवल्यानंतर ते कडक रबरासारखे तयार होते. अशा वेळी मिठाच्या पाण्यात पनीर ठेवावे आणि ते पाणी २४ तासांनी बदलावे. या ट्रिकच्या मदतीने तुम्ही जवळपास १० दिवस पनीर ताजे ठेवू शकता.
२. काही लोकांची तक्रार असते की, पनीर जास्त काळपर्यंत फ्रेश दिसत नाही. पनीर मऊ व फ्रेश ठेवण्यासाठी पातळ ओले कापड घ्यावे आणि त्यात पनीर गुंडाळून फ्रिजमध्ये ठेवावे. या ट्रिकद्वारे तुम्ही आठवडाभर पनीर ताजे ठेवू शकता.
३. जर तुम्हाला पनीर महिनाभर टिकवायचे असेल, तर पनीर क्यूब आकारामध्ये कापावे आणि फ्रिजरमध्ये ठेवावे. पाच-सहा तासांनंतर हे पनीरचे तुकडे एका हवाबंद डब्यामध्ये बंद करावेत आणि पुन्हा फ्रिजरमध्ये ठेवावे. गरजेनुसार हे तुकडे काढून कोमट पाण्यात २० ते ३० मिनिटे भिजवून ठेवावे. त्यानंतर तुम्ही पनीरचा वापर करू शकता.
४. फ्रिजचा वापर न करताही तुम्ही पनीर जास्त दिवस टिकवू शकता. एका पाण्याने भरलेल्या भांड्यात पनीर भिजवून, ते घरातील एका थंड ठिकाणी ठेवावे. हे पाणी दर ८-१० तासांनी बदलावे. असे पनीर दोन दिवस ताजे राहू शकते.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)