काही दिवसांतच २०२३ हे वर्ष संपून आपण नवीन वर्षाचे स्वागत आपल्या मित्र-परिवारासोबत, जवळच्या व्यक्तींसोबत करणार आहोत. येणाऱ्या नवीन वर्षात काय काय करायचे, कोणत्या नव्या गोष्टी शिकायच्या किंवा जुन्या गोष्टी पुन्हा नव्याने सुरू करायच्या का याचा विचार किमान मनात येण्यास सुरुवात झाली आहे. अशा संकल्पांमध्ये पुस्तके वाचणे, व्यायामाची सुरुवात, आपल्या आहाराकडे लक्ष देणे, वाईट सवयी – व्यसने सोडणे यांसारख्या गोष्टींचा समावेश बरीच मंडळी करीत असतात. परंतु, एखाद्या गोष्टीची सुरुवात करताच, काही दिवसांमध्ये सगळ्या गोष्टींमधला उत्साह निघून जाऊ लागतो. परिणामी ठरवलेली कोणतीही गोष्ट पूर्णत्वाला जात नाही आणि मग आपण पुन्हा एकदा नवीन महिन्याची, वर्षाची वाट बघत बसतो.
तुमच्या सोबतसुद्धा असेच काहीसे होते का? असे होऊ नये आणि तुम्ही ठरवलेला संकल्प पूर्ण करायचा असेल तरी अगदी सोप्या; पण उपयुक्त टिप्स तुमची नक्कीच मदत करू शकतात. त्यासाठी या सात गोष्टी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात का ते पाहा.
हेही वाचा : India ‘Swiggy’d’ in 2023 : २०२३ वर्ल्ड कप फायनलचा दिवस ठरला ‘नॅशनल फूड डे?’ १४ मे, १ जानेवारीला Swiggy च्या ऑर्डर्स पाहून व्हाल चकित…
नवीन वर्षातील संकल्प पूर्ण करण्यासाठी या सात टिप्स…
१. काय करायचे ते ठरवणे
एखादा संकल्प करायचा म्हटले की त्यामध्ये आपण भरमसाट गोष्टी लिहून ठेवतो. एवढी मोठी यादी बघूनच आपल्याला अर्ध्या गोष्टी नकोशा वाटू लागतात. त्यामुळे असे न करता, ठरावीक गोष्टींची निवड करा. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर केवळ ‘मी या वर्षी वजन कमी करणार’ असे मनाशी न ठरवता; ते किती आणि कसे कमी करायचे या गोष्टीकडे लक्ष द्या. त्यासाठी तुम्ही एक आकडा [विनाकारण मोठा आकडा नको] ठरवू शकता. त्यानुसार दररोज काय काय करावे लागेल याचा अंदाज येऊ शकतो.
२. कागदावर लिहिणे
काही जण केवळ तोंडी एखादी गोष्ट ठरवतात. त्यामुळे एकदोन दिवस त्यामध्ये खंड पडल्यास, संकल्प अपुरा राहण्याची शक्यता जास्त असते. असे न होण्यासाठी तुम्हाला करायची असलेली गोष्ट एखाद्या कागदावर उतरवून घ्या आणि तो कागद सतत तुमच्या नजरेस पडेल अशा ठिकाणी ठेवा. तुम्हाला कधी काही करण्याचा कंटाळा आल्यास किंवा तुम्ही एखादी गोष्ट करण्यासाठी विसरला असाल, तर तो कागद तुम्हाला त्याची सतत आठवण करून देत राहील.
३. लहान ध्येयांनी सुरुवात करा
बरेचदा आपण एखादी गोष्ट ठरवतो; उदाहरणार्थ- वजन कमी करणे. तेव्हा आपण खूप मोठी ध्येये डोक्यात धरून ठेवतो. जसे की, एका महिन्यात २० किलो वजन कमी करणे. हे आकडे सुरुवातीला ऐकण्यासाठी फार मस्त वाटत असतात; परंतु महिन्याच्या शेवटी बरेच जण असे विनाकारण ठरवलेले मोठे ध्येय गाठण्यात असफल होतात. हे टाळण्यासाठी सुरुवातीलाच छोटे ध्येय ठरवा. जसे की, एका महिन्यात पाच किंवा १० किलो वजन कमी करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे हळूहळू तुमचे ध्येय गाठण्यास मदत होईल.
४. चुकांची पुनरावृत्ती नको
बरेचदा आपण एकच संकल्प वर्षानुवर्षे करण्याचा प्रयत्न करीत असतो; परंतु कोणत्या तरी कारणाने तो पूर्ण होत नाही. असे जर तुमच्यासोबत होत असेल, तर तसे का होत आहे याकडे लक्ष द्या आणि त्या चुका या वर्षी पुन्हा होणार नाहीत याची काळजी घ्या.
हेही वाचा : बापरे! नवीन वर्षात मिळणार एवढे लॉन्ग वीकेंड्स! २०२४ च्या सर्व सुट्ट्यांचे आत्ताच प्लॅनिंग करून घ्या, पाहा…
५. इतरांची मदत घ्या
काही गोष्टी इतरांसोबत बोलल्याने, त्यांना सांगितल्याने त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. जर एखादा संकल्प पूर्ण करायचा असल्यास त्यात तुम्ही इतरांची मदत घेऊ शकता. आपल्या जवळच्या व्यक्ती, मित्रांशी किंवा कुटुंबीयांशी बोलल्याने तुम्हाला तुमचा संकल्प पूर्ण करण्यासाठी अधिक प्रेरणा मिळू शकते.
६. आनंद मिळेल अशा गोष्टी करा
जर इतरांप्रमाणे तुमचे कोणतेही ठरावीक संकल्प नसतील; पण तरीही काहीतरी करायची इच्छा असेल, तर अशी एखादी गोष्ट ठरवा; ज्यामधून तुम्हाला आनंद मिळेल. सोपे उदाहरण द्यायचे झाले, तर दररोज तासभर चालण्यासाठी जाणे, आठवड्यातून किमान एकदा तरी आपल्या जवळच्या लोकांना भेटून त्यांना वेळ देणे, महिन्याला एक पुस्तक वाचणे यांसारख्या लहान लहान गोष्टी करण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता.
७. पहिल्याच प्रयत्नात सगळे जमले पाहिजे असा विचार नको
तुम्ही ठरवलेली गोष्ट योग्य पद्धतीने झाली पाहिजे हे जरी बरोबर असले तरीही सगळीकडे ते तसेच झाले पाहिजे असे काही नाही. एखाद्या नव्या सवयी किंवा गोष्टींमध्ये काही दिवसांत तुम्ही तरबेज होऊ शकत नाही. त्यामुळे कोणतीही गोष्ट संयम ठेवून करावी. उदाहरण द्यायचे झाल्यास जर तुम्हाला एखाद्या शर्यतीत भाग घ्यायचा असेल, तर लगेच त्यामध्ये सहभागी होऊ नका. महिनाभर हळूहळू शरीराला स्पर्धेसाठी तयार करा आणि मग त्यामध्ये भाग घ्या. असे केल्याने तुमच्या मनावर विनाकारण ताण येणार नाही आणि तुमचा संकल्पदेखील पूर्ण होईल.