त्वचा ही आपल्या सौंदर्यातील महत्त्वाचा घटक असते. चेहऱ्याची त्वचा चांगली असेल तर नकळत आपण चांगले दिसण्यास मदत होते. प्रत्येकाच्या त्वचेचा पोत वेगवेगळा असतो. काहींची त्वचा खूप कोरडी तर काहींची तेलकट असते. तेलकट त्वचा असल्यास मेकअप फार काळ टिकत नाही. तसेच नाकावर आणि इतर ठिकाणीही तेलकट थर निर्माण झाल्याने चेहरा फ्रेश वाटत नाही. हा तेलकटपणा कमी करण्यासाठी मग वारंवार पावडर लावण्याचा पर्याय स्वीकारला जातो. पण त्यापेक्षा काही फेसपॅक वापरल्यास त्याचा त्वचेचा तेलकटपणा कमी होण्यास मदत होते. हे फेसपॅक तुम्हाला घरच्या घरी सहज बनवताही येतात. पाहूयात असे काही खास फेसवॉश…

टोमॅटो, चंदन आणि मुलतानी मातीचा फेसपॅक

हा फेसपॅक करण्यासाठी तुमच्याकडे चंदनाची पावडर असणे गरजेचे आहे. याबरोबरच टोमॅटोचा रस, मुलतानी माती आणि गुलाबाचे पाणी घ्यावे. एका भांड्यामध्ये हे सर्व पदार्थ एकत्र करुन घ्या. ते मऊ होईल इतके एकसारखे करा. त्यानंतर हा लेप चेहरा आणि मानेला लावा. हा लेप ५ ते १० मिनिटे ठेवा आणि मग चेहरा गार पाण्याने धुवा.

चंदन, संत्री आणि गुलाबपाणी फेसपॅक

यामध्ये संत्र्याच्या सालांची पावडर अतिशय महत्त्वाची आहे. ही पावडर आणि चंदनाची पावडर गुलाबपाण्यात एकत्र करावी. हा पॅक २० मिनिटे चेहऱ्याला लावून ठेवावा. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवावा.

मुलतानी माती, हळद आणि चंदन पॅक

मुलतानी माती हळदीबरोबर लावल्याने चेहऱ्याचा ग्लो वाढतो. हा पॅक बनविण्यासाठी मुलतानी माती, हळद आणि चंदन पावडर हे दुधामध्ये एकत्र करावे. चेहरा आणि मानेला हे मिश्रण लावून नंतर चेहरा धुवून टाकावा.