Relationship Advice: तो तुमच्याशी स्वतःहून बोलायला येतो.. तुमच्या खुप गप्पा होतात.. चॅटवर डोळ्यात बदाम असलेले इमोजी शेअर केले जातात..तुम्हाला असं वाटतं की सगळं काही परफेक्ट आहे पण तेवढ्यात मॅसेज येणं बंद होतं. कालपर्यंत जवळपास रिलेशनशिपमध्ये आलेले तुम्ही अचानक अनोळखी आहात की काय असं वाटावं इतके दुरावता.. बरं यातून सावरून तुम्ही पुन्हा स्थिर व्हावं तर पुन्हा त्याचा मॅसेज येतो.. अलीकडे दर दुसऱ्या मुलीकडून ही कहाणी ऐकायला मिळते, तुम्हालाही पटकन कोणती मैत्रीण आठवली असेल ना? तर मैत्रिणींनो असं होण्याचं कारण हेच की तुम्ही फ्लर्टींगची व्याख्या समजून घ्यायला गल्लत करत आहात. जर पुढच्या वेळी होणारा हार्टब्रेक टाळायचा असेल तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा..
पहिला मुद्दा तर फ्लर्ट आणि फ्रेंडली यातील फरक समजून घ्या. अनेकदा आपल्याला एखादा व्यक्ती आवडत असेल तर त्याने केलेले सर्वात कमी प्रयत्न सुद्धा आपल्याला आभाळाएवढे वाटतात. यामुळे तुमचा दर्जा कमी होऊ देऊ नका. मात्र जर का तुम्हाला एखादा व्यक्ती खरंच आवडत असेल आणि समोरून फारच संमिश्र सिग्नल येत असतील तर… खरी समस्या इथेच असते, ठोसपणे सांगता यावं असं काही नाही किंवा नाकारता यावं असंही काही नाही, अशा परिस्थितीत अडकल्यावर खालील संकेत तपासून पहा…
- तुम्हाला फक्त फावल्या वेळेत क्वचित मॅसेज येत असतील तर थेट समजून घ्या की समोरचा व्यक्ती फक्त वेळ घालवण्यासाठी आपल्याशी बोलत आहे.
- जर तुम्हाला रोज मॅसेज येत आहेत पण त्यात तुमच्याबाबत कुठेच काही माहित करून घेण्याचा प्रयत्न होत नसेल तर समजून जा की स्वतःच्या मनाला हलकं करण्यासाठीच तुमचा वापर केला जात आहे.
- याच्या अगदी उलट म्हणजे फक्त तुमचंच ऐकून घेतलं जात असेल पण स्वतःविषयी काही सांगायला तो व्यक्ती टाळाटाळ करत असेल तर त्या व्यक्तीचा तुमच्यावर विश्वास नाही असे दिसून येते.
- तुम्ही एखाद्याला एखादी गोष्ट सांंगता ती गोष्ट किंंवा तुम्ही त्या व्यक्तीसाठी महत्वाचे असाल तर ते त्याच्या नक्की लक्षात राहते, त्यामुळे तुम्ही सांगितलेल्या किमान महत्त्वाच्या गोष्टी तो किती लक्षात ठेवतो हे तपासुन पाहा.
- अनेकदा फ्लर्टींगच्या नावाखाली सेक्स्टिंगचा प्रयत्न होतो. तुम्ही तयार असाल तर हरकत नाही अन्यथा हे आधीच स्पष्ट करा.
अनेकदा तुम्हाला एखादा व्यक्ती आधी आवडतो पण बोलणं सुरु झाल्यावर कंटाळा येतो असं असल्यास हे फक्त आकर्षण असते. अशा क्षणिक आकर्षणात स्वतःला मानसिक त्रास करून घेऊ नका.