केंद्र सरकारने महिला आणि मुलींना आर्थिक मदत देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजनांद्वारे महिला आणि मुलींना आर्थिक मदत मिळते आणि त्यांचे भविष्यही सुरक्षित असते. यापैकी एक योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. या योजनेंतर्गत १० वर्षांपर्यंतच्या मुलीच्या नावावर कोणतेही पालक खाते उघडू शकतात. ज्यामध्ये मुलीच्या चांगल्या भविष्यासाठी वार्षिक १.५ लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत, मुलगी १८ वर्षांची झाल्यावर शिक्षणासाठी आणि २१ वर्षांची झाल्यावर लग्नासाठी हा निधी वापरला जाऊ शकतो.

सुकन्या समृद्धी खाते कोणतीही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये उघडले जाऊ शकते. या योजनेत पालक त्यांच्या मुलीच्या नावावर सुरुवातीला किमान १००० रुपये आणि नंतर १०० रुपयांच्या पटीत जमा करू शकतात. एका आर्थिक वर्षात या खात्यात जास्तीत जास्त १.५ लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. या गुंतवणुकीला प्राप्तिकरातूनही सूट देण्यात आली आहे. कामानिमित्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बदली झाली तर सुकन्या समृद्धी खाते सुरु ठेवणं कठीण होतं. अशा परिस्थितीत सुकन्या समृद्धी खाते दुसऱ्या बँकेच्या किंवा पोस्ट ऑफिसच्या दुसऱ्या शाखेत हस्तांतरित केले जाऊ शकते. यामुळे तुमचे सुकन्या समृद्धी खाते बंदही होत नाही आणि तुम्हाला योजनेचा पूर्ण लाभही वेळेवर मिळतो.

सुकन्या समृद्धी खाते कसे हस्तांतरित कराल

  • खाते हस्तांतरित करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या बँकेत अर्ज द्यावा लागेल.
  • ज्या बँक, शाखा आणि शहरामध्ये खाते हस्तांतरित करायचे आहे त्याचा तपशीलही सोबत द्यावा लागेल.
  • जुनी बँक सुकन्या समृद्धी खात्याच्या संपूर्ण रकमेचा ड्राफ्ट तयार करेल आणि तुम्हाला देईल.
  • यानंतर जुनी बँक तुमचे खाते तुम्हाला हव्या त्या बँकेत ट्रान्सफर करेल.
  • ड्राफ्ट सबमिट झाल्यानंतर संबंधित बँकेला KYC तपशील दिल्यानंतर या खात्यातील गुंतवणूक पुन्हा सुरू करता येईल.