आपला चेहरा हा आपल्या सौंदर्यातील अतिशय महत्त्वाचा घटक असतो. त्यातही चेहऱ्याची त्वचा चांगली असणे आवश्यक असते. मानसिक किंवा शारीरिक तक्रारींमुळे अनेकांच्या चेहऱ्यावर त्याचा वाईट परिणाम झालेला दिसतो. कधी चेहऱ्यावर काळे डाग येणे, चेहरा खूप कोरडा किंवा तेलकट होणे अशा समस्या उद्भवतात. यातही सगळ्यात मोठी समस्या असते ती म्हणजे चेहऱ्यावर येणारे फोड आणि पिंपल्स यांची. तरुण वयात तर अनेकांना हे पिंपल्स इतक्या मोठ्या प्रमाणात येतात की आपल्या चेहऱ्याची लाज वाटायला लागते. हे पिंपल्स फुटणे, त्याचे काळे डाग पडणे आणि त्यामुळे चेहरा खराब होणे अशा तक्रारी तरुणांमध्ये सातत्याने पाहायला मिळतात. यावर वेळीच योग्य ते उपाय केल्यास त्याचा म्हणावा तितका त्रास होत नाही. पाहूयात पिंपल्सवर असेच काही सोपे उपाय…
तेल – चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यासाठी काही विशिष्ट तेल उपयुक्त ठरतात. यामध्ये लव्हेंडर ऑईल, चहाच्या वनस्पतीचे तेल यांचा समावेश होतो. थोडेसे तेल कापूस किंवा टीश्यू पेपरवर घेऊन या पिंपल्सवर लावल्यास त्याचा पिंपल्स कमी होण्यास चांगला फायदा होतो.
सफरचंदाचे व्हीनेगर – सफरचंदाचे व्हीनेगर आरोग्याच्या विविध समस्यांसाठी उपयुक्त असते. चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यासाठीही याचा अतिशय चांगला उपयोग होतो. पिंपल्सचा लालसरपणा कमी होण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. मात्र व्हीनेगर हे रासायनिक असल्याने ते जास्त प्रमाणात न वापरता अतिशय कमी प्रमाणात वापरावे.
ग्रीन टी – ग्रीन टीमध्ये आरोग्यासाठी ज्याप्रमाणे औषधी गुणधर्म असतात. त्याचप्रमाणे चेहऱ्यावरील पिंपल्ससाठीही ग्रीन टी अतिशय उपयुक्त असतो. ग्रीन टी फ्रीजरमध्ये ठेऊन तो चांगला गार करा. त्यानंतर तो थेट चेहऱ्याला लावा. त्यामुळे त्वचा कोमल होण्यास मदत होईल आणि पिंपल्सचा लालसरपणाही कमी होईल.