प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात बेकिंग सोड्याचा वापर केला जातो. पीठ आंबवण्यापासून ते भजी बनवण्यापर्यंतच्या खाद्यपदार्थांसाठी बेकिंग सोडा खूप उपयुक्त मानला जातो. बेकिंग सोड्याला सोडियम बायकोर्बोनेट, असे म्हणतात; ज्याचा वापर फक्त बेकिंगसाठीच नाही तर स्वयंपाकघरातील इतर अनेक खाद्यपदार्थ बनवण्यासह आरोग्यासाठी केला जातो. एकंदरीत बेकिंग सोड्याचा सहा प्रकारे उपयोग केला जातो.
१) दात पांढरे करण्यासाठी
सततच्या खाण्यामुळे दातांमध्ये पिवळेपणा जमा होऊ लागतो. अशा वेळी बेकिंग सोडा पाण्यात मिसळून घासल्याने दातांचा पिवळेपणा कमी होऊ शकतो. एवढेच नाही, तर हा एक प्रकारे नॅचरल माउथवॉश आहे; जे श्वसनाची दुर्गंधी निर्माण करणारे जीवाणू साफ करण्यात मदत करते.
२) शरीराची दुर्गंधी दूर करण्यासाठी
काही लोकांना खूप जास्त घाम येतो; खराब जीवाणूंमुळे असे होते. घामाचा वास कमी करण्यासाठी बेकिंग सोडा खूप उपयुक्त मानला जातो. त्यासाठी पाण्यात बेकिंग सोडा मिसळा आणि अंडरआर्म्स किंवा ज्या ठिकाणी जास्त घाम येतो, तेथे स्प्रे करा. यामुळे तुमच्या शरीरातील पीएच लेव्हल सुधारते आणि दुर्गंधी निर्माण करणारे खराब जीवाणू काढून टाकण्यास मदत होते. परिणामत: घामाचा वास कमी होतो आणि शरीराची दुर्गंधी दूर होते.
३) फळे आणि भाज्यांवरील कीटकनाशके काढण्यासाठी
फळे आणि भाज्यांवर फवारलेली कीटकनाशके काढून टाकण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर केला जातो. भाजा आणि फळे स्वच्छ करण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे. त्यासाठी पाण्यात बेकिंग सोडा मिसळा आणि त्या द्रावणाने फळे आणि भाज्या धुऊन घ्या. असे केल्याने कीटकनाशके नष्ट होतात.
४) किचनवरील हट्टी डाग काढण्यासाठी
बेकिंग सोडा स्वयंपाकघरातील सिंक, टाइल्स, चॉपिंग बोर्ड किंवा किचन प्लॅटफॉर्मवरील साचलेली घाण, हट्टी डाग साफ करण्यास मदत करतो. त्यासाठी व्हाईट व्हिनेगरमध्ये बेकिंग सोडा मिसळून अनेक डाग सहज काढता येतात.
५) फ्रिजमधील दुर्गंधी कमी करण्यासाठी
फ्रिजमध्ये अनेक गोष्टी ठेवल्या जातात. त्यामुळे फ्रिजमधून विशेष वास येऊ लागतो. या प्रकारचा वास दूर करण्यासाठी रेफ्रिजरेटर बेकिंग सोड्याने स्वच्छ करू शकता किंवा कपमध्ये बेकिंग सोडा भरून, तो ओपन रेफ्रिजरेटमध्ये ठेवल्यास वास निघून जाईल.
६) रूममधील दुर्गंधी दूर करण्यासाठी
एअर फ्रेशनर म्हणून अनेक जण बरेच महागडे फ्रेशनर विकत घेतात. पण, बेकिंग सोड्यानेही रूममधील दुर्गंधी दूर करता येते. त्यासाठी एका भांड्यात एक-तृतियांश बेकिंग सोडा घ्या. त्यात इसेन्शियल ऑइलचे १० ते १५ थेंब मिसळा. मग ते भांड कापडाने झाकून त्याला दोरीच्या साहाय्याने बांधा आणि घरात लटकवून ठेवा, जे एक उत्तम रूम फ्रेशनर म्हणून काम करते. थोड्या वेळाने एकदा चांगले मिस्क करा.