मेंदूच्या ‘एमआरआय’ स्कॅनिंगमुळे लहान मुलांमधील ‘मल्टिपल स्क्लेरॉसिस’चा धोका ओळखणे शक्य असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनात स्पष्ट झाले आहे. मुलांमध्ये ‘मल्टिपल स्क्लेरॉसिस’चा धोका वाढत असून या संशोधनामुळे त्यांच्यावर तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे.

‘मल्टिपल स्क्लेरॉसिस’मुळे मेंदूतील चेतापेशी आणि मज्जारज्जूवरील मायेलिनचा थर कमकुवत होऊ लागतो. त्यामुळे मेंदू आणि शरीर यांच्यातील परस्पर संपर्कावर त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे येणारे अपंगत्व रोखणे अतिशय कठीण होते.

अमेरिकेतील याले विद्यापीठातील संशोधकांनी या विषयावर अभ्यास केला आहे. त्यानुसार ‘एमआरआय स्कॅन’द्वारे मल्टिपल स्क्लेरॉसिसचा धोका आणि मेंदूत होणारे परिणाम ओळखणे सहजशक्य असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले. जगभरात १६ ठिकाणी ३८ लहान मुलांचे डोकेदुखीच्या तक्रारीमुळे ‘एमआरआय स्कॅनिंग’ करण्यात आले. त्यावेळी वैद्यकीय अहवालात ‘मल्टिपल स्क्लेरॉसिस’चा आजार उघड झाला. पूर्वी केवळ पौढांमध्ये आढळणारा हा आजार मुलांमध्येही बळावत असल्याचा निष्कर्ष त्याद्वारे निघाला. प्रथमच मुलांमधील हा धोकादायक आजार शोधून त्याचा विस्तार शोधण्याला आम्ही प्राधान्य दिल्याचे याले वैद्यक शाळेतील साहाय्यक प्राध्यापक नायला मिखानी यांनी सांगितले. तब्बल ४२ टक्के लहान मुलांमध्ये एमआरआयनंतर मल्टिपल स्क्लेरॉसिस प्राथमिक स्वरूपात आढळल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले.