शासकीय दंत महाविद्यालयाचे संशोधन
नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या दंत परिवेष्टनशास्त्र विभागाच्या वतीने मानवी व कृत्रिमरीत्या तयार होणाऱ्या हाडांच्या भुकटीचा कृत्रिम दंतनिर्मितीवर काय परिणाम होतो?, यावर संशोधन करण्यात आले. त्यात मानवी हाडांची भुकटी कृत्रिम दंतनिर्मितीसाठी सर्वोत्तम असल्याचे पुढे आले. कृत्रिम हाडांची भुकटी मात्र विश्वासदर्शक नसल्याचेही निदर्शनात आले. हे संशोधन डॉ. वैभव कारेमोरे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.
हिरडय़ांच्या आजारात जबडय़ाच्या हाडाची गळती होत असते. या रुग्णांमध्ये दातांचा आधार वाढविण्यासाठी नवीन हाडांच्या निर्मितीची गरज असते. शिवाय, अत्याधुनिक दंत प्रत्यारोपणातदेखील जबडय़ाच्या हाडाची उंची वाढवण्याकरिता दंतचिकित्सेत हाडांची भुकटी (बोन ग्राफ्ट मटेरियल) वापरली जाते. दंतवैद्यकशास्त्राच्या दंत परिवेष्टनशास्त्र विभागात या विषयांतर्गत शस्त्रक्रिया केल्या जातात. ४० वर्षांपासून ही भुकटी वापरली जात आहे, पण शास्त्रीयदृष्टय़ा हाडांच्या भुकटीचे नैसर्गिक हाड तयार होते की, ते फक्त दाताला तांत्रिक आधार देण्याकरिता जबडय़ात राहतात, हा तिढा अनेक वर्षांपासून कायम आहे.
शस्त्रक्रियेनंतर भुकटीचे हाडात रूपांतर झाले की नाही, हे पाहण्यासाठी पुन्हा शस्त्रक्रिया करणे वैज्ञानिकदृष्टय़ा योग्य नाही. त्यासाठी मानवी पेशींचे हाडाच्या भुकटीच्या सानिध्यात होणारे बदल आणि जडणघडण मानवी शरीराबाहेर तपासणे आवश्यक आहे. डॉ. वैभव कारेमोरे यांनी विद्यार्थी व इतर शिक्षकांच्या मदतीने हिस्लॉप स्कूल ऑफ बायोटेक्नोलॉजी विभागातील तत्कालीन शास्त्रज्ञ डॉ. देवव्रत बेडगे यांच्या नेतृत्वाखाली या प्रकल्पावर काम सुरू केले. संशोधनात मानवी हाडांची भुकटी रुग्णाच्या हाडापासून मिळवून, तसेच व्यावसायिकदृष्टय़ा उपलब्ध असलेली मानवी हाडांची भुकटी आणि कृत्रिम तयार केलेली सिलीकॉनची भुकटी यांची प्रथिने वेगळी केली.
मानवी हाडांची निर्मिती करणाऱ्या मानवी शरिरातील फायब्रोब्लास्ट या पेशींचे प्रयोगशाळेत सेललाईन तयार केले. त्यानंतर हाडांच्या भुकटीच्या प्रथिनांचे अर्क या सेललाईनमध्ये मिश्रित केले. संशोधनात हाडांच्या भुकटीच्या प्रथिनांच्या वातावरणात मानवी पेशी जिवंत राहण्याचे प्रमाण समविभाजन (वाढवणारे) असल्याचे पुढे आले. संशोधनात मानवी शरिरात रुग्णाच्या शरिरातून काढलेली भुकटी ही दंत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेकरिता सर्वोत्तम पर्याय आहे. त्या पाठोपाठ बाजारात उपलब्ध असलेली मानवी हाडांची भुकटी अल्प परिणामकारक आढळून आली.
रुग्णांनी पर्याय निवडावा
दात गळालेल्या रुग्णांना कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी बरेच दातांचे डॉक्टर वेगवेगळ्या हाडांच्या भुकटीचे पर्याय देतात. त्यात कृत्रिमरीत्या तयार केलेल्या हाडांच्या भुकटीचाही समावेश असतो. ही भुकटी फार महाग असून त्याची वैद्यकीय क्षेत्रात विश्वासार्हताही नगण्य आहे. उलट मानवाच्या जबडय़ाखालील हाडातून काढलेली भूकटी ही कृत्रिम दंतनिर्मितीसाठी लाभदायक आहे. तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांच्या पर्यायाकडे दुर्लक्ष करून स्वतच्या भुटकीचाच पर्यायाचा आग्रह धरावा. – डॉ. वैभव कारेमोरे,
दंत परिवेष्टनशास्त्र विभागाचे प्रमुख, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर
मानवी हाडांची भुकटी कृत्रिम दातांच्या निर्मितीसाठी सर्वोत्तम
मानवी हाडांची भुकटी कृत्रिम दंतनिर्मितीसाठी सर्वोत्तम असल्याचे पुढे आले.
Written by महेश बोकडे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-04-2016 at 01:59 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Human bone powder best for making artificial teeth