Husband Appreciation Day : दरवर्षी एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी ‘Husband Appreciation Day’ साजरा केला जातो. नवरा-बायको हे आयुष्याचे दोन मजबूत खांब असतात. अनेकदा महिलांना प्रोत्साहन देताना पुरुषांना मात्र गृहीत धरले जाते. “तो नवरा आहे; त्यानं ते केलं पाहिजे, त्याची जबाबदारी त्यानं स्वीकारली पाहिजे, तो करणार नाही तर कोण करणार”, असं अनेकदा सहज बोललं जातं पण जेव्हा आपण समानतेचा विचार करतो, तेव्हा तुमच्या कधी लक्षात आले का की, महिलांचे ज्याप्रमाणे छोट्या छोट्या गोष्टींसाठी कौतुक केले जाते. तसेच कौतुक पुरुषांचे कधीच केले जात नाही. त्यांनाही कौतुकाची आणि प्रोत्साहनाची गरज असते.
भारतीय समाजात पुरुषप्रधान संस्कृती पाहायला मिळते. अनेकदा त्यावरून टीकाही केली जाते. पण, तुम्ही कधी विचार केला का की, भारतीय संस्कृतीत नवरा म्हणून किंवा पती म्हणून पुरुषाची काय भूमिका असते? त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी लोकसत्ताने वरिष्ठ विवाह समुपदेशक डॉ. स्मिता प्रकाश जोशी यांच्याशी संवाद साधला.
कुटुंबप्रमुख म्हणून नवऱ्याची कोणती जबाबदारी असते?
डॉ. स्मिता प्रकाश जोशी : पुरुष हा कुटुंबप्रमुख असतो. आजही आपल्या भारतीय समाजामध्ये स्त्री कमावणारी असली तरी कुटुंबप्रमुख म्हणून पुरुषाकडे बघितले जाते. आता कायदा असा आलाय की, आपल्या नावापुढे आईचेही नाव लावावे; पण त्यापूर्वी वडिलांचे नाव लावले जायचे. कुटुंबातील सर्वांना पुढे घेऊन जाणे; मग त्यांचे काय गुण-दोष असतीलही, कोणी चुकत असेल तरी त्याला समजावून सांगणे ही एक कुटुंबप्रमुख म्हणून नवऱ्याची जबाबदारी असते.
नवऱ्याला खरेच गृहीत धरले जाते?
डॉ. स्मिता प्रकाश जोशी : नवरा म्हणून पुरुषाने त्याची सर्व कर्तव्ये पूर्ण केली पाहिजेत, हे गृहीत धरले जाते. हे समानतेचे युग आहे. स्त्री-पुरुष समानता आहे, संविधानानेसुद्धा आपल्याला समानता दिली आहे. मग स्त्री-पुरुषांच्या बाबतीमध्ये ही असमानता का? आताच्या पिढीतील मुलींना लग्न केल्यानंतर असे वाटतं की, नवऱ्यानंच घरातील सर्व बघावं. बाकी सर्व बाबतीमध्ये बरोबरी पाहिजे; पण ज्यावेळी पैशांचा हिशोब येतो, त्यावेळी मुली एक पाऊल मागे घेतात. पण, समानता पाहिजे असेल, तर सर्वच बाबतीत समानता असणे आवश्यक आहे आणि अशात जर नवरा घरची जबाबदारी घेत असेल, तर त्याचे कौतुक करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
मुलींवर कायम दबाव नसतो की, ती स्वत:च्या पायांवर उभी राहिली पाहिजे. लग्न करतानासुद्धा तिने पैसा कमवावा, अशी अपेक्षा नसते; पण मुलांच्या बाबतील मात्र हे उलट असते. मुलांनी जबाबदारी घेतली पाहिजे, त्याचं घर असायला पाहिजे, त्याचा पगार इतका असायला पाहिजे तरच ते लग्न करू शकतात. २७ -२८ वर्षांचा मुलगा चांगला स्थिरस्थावर पाहिजे, अशी मुलींची अपेक्षा असते; पण त्याच वयातील मुली तशा झाल्या आहेत का, याचा विचार करणे गरजेचे आहे. जर तो करतो आहे, तर त्याचे किमान कौतुक करणे अपेक्षित आहे. नवऱ्याला सहकार्य करणे गरजेचे आहे.
अनेकदा पुरुषांना सांगितले जाते की, मुलगी घर सोडून येत आहे. तिला मदत कर किंवा सहकार्य कर. तिच्या आयुष्यात फार मोठा बदल होतोय; पण हे विसरता कामा नये की, जेव्हा पत्नी म्हणून एक स्त्री त्याच्या घरी येते तेव्हा पुरुषांच्या आयुष्यातही बदल होतो. त्यांच्याही बऱ्याच जबाबदाऱ्या वाढतात. सर्व नाती सांभाळताना बायकोला सांभाळणे, हेसुद्धा खूप महत्त्वाचे आहे.
नवरा व्यक्त का होत नाही?
डॉ. स्मिता प्रकाश जोशी : भारतीय संस्कृतीमध्ये मुलगा म्हटले की जबाबदारीने वागले पाहिजे, याच दृष्टिकोनातून त्याची लहानपणापासून वाढ होते. थोडे जरी दु:ख झाले तरी ‘बाईसारखा रडत बसू नकोस’, ‘मुलगी आहेस का रडायला’, अशा रीतीने त्याला दूषणे दिली जातात. त्यामुळे त्याला व्यक्त होता येत नाही. मनातल्या मनात त्याला खूप त्रास होत असतो. अशा वेळी बायकोने समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्यालाही भावना आहेत. त्यामुळे त्याने व्यक्त होणे गरजेचे आहे. त्यासाठी त्याला स्वातंत्र्य देणे गरजेचे आहे. प्रत्येक वेळी आपण मुलीला समानतेची वागणूक द्या, असे म्हणतो; पण त्याचबरोबर मुलालाही समानतेची वागणूक मिळणे गरजेचे आहे.
हेही वाचा : लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा मतदान करताना तरुणींनी उघडपणे मांडली भूमिका; जाणून घ्या त्या काय म्हणाल्या?
खरंच नवरासुद्धा मानसिक, शाब्दिक व कौंटुबिक अत्याचाराला बळी पडू शकतो?
डॉ. स्मिता प्रकाश जोशी : कौटुंबिक हिंसाचार कायदा हा बायकांसाठी आहे. बायका अन्यायाविरुद्ध या कायद्यांतर्गत तक्रार दाखल करू शकतात. त्या कायद्यान्वये पुरुषांना तक्रार दाखल करता येत नाही; पण कायद्याने दुसरे एक संरक्षण दिले आहे की, जर महिला किंवा कुटुंबाकडून पुरुषांना मानसिक त्रास होत असेल, त्याचा मानसिक छळ होत असेल, तर त्या कारणाखाली तो तक्रार दाखल करू शकतो. हे बऱ्याच लोकांना माहीत नाही. कायदा फक्त स्त्रियांचा विचार करतो, हा गैरसमज आहे. कायदा हा दोन्ही बाजूंनी विचार करतो
आताच्या परिस्थितीमध्ये पती-पत्नी दोघेही उच्चशिक्षित आणि नोकरी करणारे असतात अशा वेळी पत्नीकडूनही कोणत्याही कारणास्तव पुरुषांचा मानसिक छळ होऊ शकतो. फक्त ते व्यक्त होत नाहीत आणि त्याबाबत तक्रार दाखल करीत नाहीत. पण, काही असे कायदे आहेत की, जे महिलांसाठीच आहेत; ते पुरुषांसाठी नाहीत. पण, हे समजून घेणे गरजेचे आहे की पुरुषसुद्धा वेगळ्या पद्धतीने कौंटुबिक हिंसाचाराला बळी पडू शकतो.
जेव्हा आपण मुलींना समानतेचे धडे देतो तेव्हा घरातील जबाबदाऱ्या, आर्थिक जबाबदाऱ्यांच्या बाबतीतही समानता स्वीकारायला पाहिजे. ‘मी कमावती आहे, तर मी माझा पैसा घरात देणार नाही’, असे बोलू नये. घर ही दोघांची जबाबदारी आहे. त्यामुळे घराची जबादारी समानतेने स्वीकारली पाहिजे. ज्याप्रमाणे आता पुरुष स्वयंपाकघरात वावरताना दिसतो, घरकामात मदत करताना दिसतो, त्याप्रमाणे पत्नीनेही आर्थिक जबाबदारीमध्ये सहभागी होणे गरजेचे आहे.
नवऱ्याला समान वागणूक का दिली जात नाही?
डॉ. स्मिता प्रकाश जोशी : भारतीय संस्कृतीमध्ये पुरुष हा कुटुंबप्रमुख आहे. त्यामुळे घरच्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी ही त्याच्यावर असते. तिने नोकरी केलीच पाहिजे याची अजूनही सक्ती केली जात नाही. आवड म्हणून ती नोकरी करू शकते, असे म्हटले जाते. शेवटी ही पती-पत्नीची वैयक्तिक निवड आहे. अनेक घरांमध्ये पुरुष काही कारणास्तव कमावू शकत नाही, अशा वेळी स्त्री कुटुंबप्रमुख होते. पण जेव्हा ती आवड म्हणून काही गोष्टी करतेय, तेव्हा तिने वेगळ्या जबाबदाऱ्या घेऊन घराला हातभार लावणेही गरजेचे आहे. आवड म्हणून नोकरी करीत असाल, तर त्या पैशांची वेगळ्या पद्धतीने गुंतवणूक करायला हवी. स्वाभिमानाने जगायचे असेल, तर फक्त नवऱ्यावर अवलंबून राहून चालणार नाही. तिने स्वत: कमावणे गरजेचे आहे. त्याचबरोबर घरातील जबाबदारी तिने समान पातळीवर राहून स्वत: उचलणेही महत्त्वाचे आहे.
मला व्यवस्थित स्थिरस्थावर झालेला नवरा पाहिजे. मी जरी काही कमावले नाही तरी मला सांभाळणारा नवरा पाहिजे, ही अपेक्षा करणे चुकीचे आहे. त्यासाठी लग्नापूर्वी समुपदेशन केले जाणे गरजेचे आहे. तुम्हाला कसा जोडीदार हवा आहे. तुम्हाला साथ देणारा जोडीदार हवा आहे की फक्त आर्थिक गोष्टी बघून लग्न करणार आहात, या गोष्टींचा विचार मुलींनी करायला हवा. मुलींनी स्वत:चा विचार बदलणे आणि खरेच समानता हवी असेल, तर स्वत:ही नवऱ्याला समान वागणूक देणे गरजेचे आहे.
असे म्हणतात की, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री असते. कुटुंबव्यवस्था चालविताना कुटुंबप्रमुख म्हणून नवरा असेल, तर त्याच्या चांगल्या गोष्टींचेही कौतुक केले, तर तोसुद्धा जास्तीत जास्त जबाबदारी घेऊन कुटुंबाकडे लक्ष देईल. कारण- त्यालाही प्रोत्साहनाची गरज असते. “तुला हे जमत नाही, तुला हे करता येत नाही”, असे जर म्हटले, तर त्याचे खच्चीकरण होऊ शकते आणि जर कुटुंब चालवायचे असेल, तर नवऱ्याच्या चांगल्या कामाचे आणि कर्तृत्वाचे कौतुक करून, त्याला पुढे जाण्यासाठी मदत करा.