फेसबुक कायम आपल्या ग्राहकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने योग्य तो विचार करत असते. असाच विचार करुन फेसबुकने युजरच्या सुरक्षिततेसाठी आणखी एक नवीन फिचर लाँच केले आहे. अनेकदा आपल्याला माहित नसलेल्या लोकांच्याही असंख्य फ्रेंड रिक्वेस्ट सातत्याने येत असतात. आपल्याला त्याकडे लक्ष द्यायलाही वेळ होत नाही. पण फेसबुकनेच आता याबाबतची काळजी घेतली आहे. या फिचरच्या साह्याने युजर्स आपल्या अकाऊंटवर येणाऱ्या फ्रेंड रिक्वेस्ट ब्लॉक करू शकतात.
याबाबत फेसबुकचे सुरक्षा अधिकारी एंटिगोन डेविस यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले अनेकदा वेगळ्याच नावाने फेक अकाऊंट तयार करुन इतरांना विशेषत: मुलींना त्रास देण्याचे प्रकार फेसबुकच्या माध्यमातून केले जातात. सायबर सेलकडेही अशाप्रकारच्या तक्रारींची नोंद केली जाते. अशाप्रकारच्या फेक अकाऊंटसवर प्रतिबंध आणण्यासाठी आणि इतरांच्या सुरक्षेसाठी हे फिचर आणल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे युजरने ब्लॉक केलेल्या फेक अकाऊंटवरून फ्रेंड रिक्वेस्ट किंवा मेसेज पाठवण्याचा प्रयत्न केल्यास हे टूल युजरला तशी पूर्वसुचना देणार आहे.
जीमेलमध्ये ज्याप्रमाणे आवश्यक नसलेले मेल स्पॅममध्ये जातात. त्याचप्रमाणे फेसबुकने एक फिचर लाँच केले आहे. या फिचरमुळे कोणत्याही व्यक्तीला ब्लॉक केलेले नसेल तरीही अनवाँटेड मेसेज इनबॉक्समधून बाजूला होऊन फिल्टर्ड मेसेजमध्ये दिसतील. त्यामुळे असे मेसेजकडे तुम्ही दुर्लक्ष करु शकता. याशिवाय विशेष बाब म्हणजे हे मेसेज वाचल्यानंतरही समोरच्या व्यक्तीला तुम्ही हा मेसेज वाचला आहे की नाही, हे कळणार नाही. मात्र अजून ग्रुप चॅटसाठी ही सुविधा उपलब्ध नाही.
फेसबुकने नुकतेच आणखी एक भन्नाट फिचर लाँच केले होते. फेशियल रिकग्निशन फीचर ‘फोटो रिव्यू’ या फिचरमुळे दुसऱ्या कोणी अपलोड केलेला फोटोत तुमचा फोटो असल्यास तुम्हाला अलर्ट मिळणार आहे. तुम्हाला एखाद्याने टॅग न करता फोटो टाकला असेल तरीही तुम्हाला त्याचे नोटीफीकेशन मिळू शकेल. यासाठी फेसबुकने विशेष कार्यप्रणाली सुरु केली आहे.