सध्या नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम अशा डिजिटल प्लॅटफॉर्मचे अनेक चाहते आहेत. अनेकजण टिव्ही पाहण्यापेक्षा या डिजिटल प्लॅटफॉर्मना जास्त पसंती देतात. परंतु नेटफ्लिक्स सध्या एक मोठा बदल करत असल्याची माहिती समोर आली आहे. ज्या युझर्सकडे नेटफ्लिक्स आहे परंतु त्यांनी त्याचा वापर केला नाही अशा युझर्सना नेटफ्लिक्स एक नोटिफिकेशन पाठवून प्लॅनच्या बाबतीत विचारणा करणार आहे. जर युझरनं या नोटिफिकेशनला उत्तर दिलं नाही तर त्याचा अकाऊंड सस्पेंड करण्यात येणार आहे. तसंच अकाऊंट सस्पेंड झाल्यानंतर युझरला पुन्हा नेटफ्लिक्स वापरायचं असेल तर त्यांना पुन्हा नेटफ्लिक्सचा एखादा प्लॅन घ्यावा लागणार आहे. नेटफ्लिक्सनं आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली.
ज्या युझर्सनं नेटफ्लिक्सवर गेल्या एक वर्षभरापासून काही पाहिलं नाही त्यांना आम्ही याबाबत विचारणा करत आहोत, असी माहिती नेटफ्लिक्सचे प्रोडक्ट इनोव्हेशन हेड एडी वू यांनी दिली. तसंच युझर्सना आपली मेंबरशिप पुढे सुरू ठेवायची आहे की नाही याबाबतही माहिती द्यावी लागणार आहे. ग्राहकांची संख्या कमी होणं ही काही नेटफ्लिक्ससाठी मोठी बाब ठरणार नाही. इनअॅक्टिव्ह अकाऊंट हे त्यांच्या युझरबेसच्या एक टक्क्यापेक्षाही कमी असतील, असंही त्यांनी नमूद केलं.
नेटफ्लिक्सद्वारे आपल्या युझर्सचा पर्सनलाइझ्ड डेटा १० महिन्यांसाठी स्टोअर करून ठेवला जातो. जर कोणताही युझर पुन्हा आपला अकाऊंट अॅक्टिव्हेट करत असेल तर त्यानं सेव्ह केलेले सेटिंग्स आणि आवडते शो त्यांना परत मिळतात. नेटफ्लिक्स भारतातील आपला युझरबेस मोठ्या प्रमाणात वाढवण्याची शक्यता आहे. तसंच जेव्हापासून कंपनीनं भारतात आपली सेवा सुरू केली आहे तेव्हापासून कंपनीनं युझर्ससाठी अनेक आकर्षक प्लॅन्स आणले आहेत. काही महिन्यांपूर्वी नेटफ्लिक्सनं भारतात १९९ रूपये प्रति महिन्याचा प्लॅन युझर्ससाठी लाँच केला होता. केवळ मोबाईलवर नेटफ्लिक्स पाहणाऱ्यांसाठी हा प्लॅन आणण्यात आला होता. हा प्लॅन अनेक युझर्सच्या पसंतीसही उतरला होता.