आपले केस जाड, लांब आणि काळेभोर असावेत अशी प्रत्येक स्त्रिची इच्छा असते. पण सध्याच्या जीवनशैलीमुळे केसांचा पोत खराब होतो आणि मग नेमके काय करावे हे कळत नाही. प्रदूषण, शाम्पूचा भडीमार आणि इतर अनेक गोष्टींमुळे केस पातळ होतात. शिवाय सध्या ताण हे केस गळण्याचे एक महत्त्वाचे कारण असते. महिलांचे सौंदर्य तर त्यांच्या केसातच असते असे म्हटले जाते. वेगवेगळ्या शाम्पू आणि कंडिशनरसोबतच सध्या केस चांगले राहावेत यासाठी केसांना सिरम लावण्याचे फॅड आले आहे. सिरम लावल्याने केसांना एक प्रकारची चमक येते. पण आपल्या केसांसाठी कोणत्या प्रकारचे सिरम चांगले हे ओळखणे गरजेचे आहे. पाहूयात याच संदर्भातील काही महत्त्वाच्या टीप्स…
१. सिलिकॉन असलेल्या उत्पादनांचा कोट केसांना चमक येण्यासाठी उपयुक्त असतो. त्यामुळे केसांचा पोत चांगला राहण्यासही मदत होते.
२. तुमचे केस तेलकट, कोरडे, रुक्ष कसे आहेत हे ओळखा. बाजारात अशीही काही सिरम आहेत जी केसांच्या विशिष्ट पोतनुसार तयार केलेली असतात. तुम्हाला तुमच्या केसांचा पोत माहित नसेल तर तुमच्या स्टायलिस्टकडून त्याबाबत समजून घ्या आणि त्याप्रमाणेच सिरमची निवड करा.
३. सिरम वापरण्याआधी केस योग्य पद्धतीने धुवा. सिरम हे स्वच्छ आणि शाम्पू केलेल्या केसांवर लावणे अपेक्षित असते.
४. सिरममुळे केसांचे धूळ आणि प्रदूषण यांपासून संरक्षण होते. त्यामुळे सिरम लावण्याआधी केस स्वच्छ असणे आवश्यक आहे.
५. धुतलेल्या केसांवर सिरम लावणे आवश्यक असले तरीही ओल्या केसांवर सिरम लावू नये. केस पूर्ण कोरडे झाल्यावरच सिरम लावावे.
६. तसेच सिरमचा अतिवापरही केसांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतो. कारण जास्त प्रमाणात सिरम लावले तर त्यावर जास्त घाण बसण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमच्या केसांच्या लांबीप्रमाणे हातावर सिरम घ्या आणि ते वरचेवर केसांना लावा.
७. सिरम हे डोक्याला लावायचे नसून केसांना लावायचे असते. त्यामुळे ते हातावर घेऊन केसांना वरचेवर लावा. यावेळी ते सगळीकडे एकसारखे लागेल याची काळजी घ्या.